

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील देवरुखजवळील वांझोळे-बावनदी येथील सूर्यकांत वाजे आणि त्यांचे भाचे सुधाकर कोटकर यांनी मुंबईतल्या झाडाचा आंबा थेट देवरुखात आणला व तोही एसटीच्या प्रवासातून, कोणताही गाजावाजा न करता.
मुंबईत स्थायिक झालेल्या वाजे कुटुंबाच्या मातोश्रींनी आपल्या गावच्या आठवणी जपण्यासाठी काही वर्षांपूर्वी मुंबईत लालबाग येथे आंब्याचे झाड लावले. त्या झाडाची जपणूक झाली, ते वाढले आणि कालांतराने त्याला गोड आंबे लागायला लागले. घरच्यांमध्ये वाटून, प्रेमाने खाऊन त्या आंब्याने मुंबईतही कोकणची चव जिवंत ठेवली.
काळाच्या ओघात सुधाकर कोटकर गोदरेज कंपनीतून निवृत्त होऊन पुन्हा गावाकडे देवरुखात स्थायिक झाले. यंदाच्या हंगामात मुंबईतील त्या झाडाला भरपूर आंबे लागले. नातेवाईकांत वाटप करून उरलेले आंबे सूर्यकांत वाजे यांनी खास भाच्यासाठी खास देवरुखात आणले.
देवरुख शहरातील साईनाथ कोल्ड्रिंक्स येथे या आंब्याचे जोरदार स्वागत करण्यात आले. याक्षणी वाजे आणि कोटकर यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद, अभिमान आणि आपल्या मातीतल्या आठवणींचं समाधान हेच कोकणातील आंब्याचं खरं मूल्य होतं. आजही अनेकांना वाटतं की कोकण म्हणजे फक्त हापूस, पण हा गैरसमज आहे. अस्सल कोकणी माणूस हापूससोबतच रायवळ, पायरी, खोबरी, रत्ना, भोपळी अशा विविध जातींच्या आंब्यांवरही तितकंच प्रेम करतो.
पूर्वी घराघरांत फिरून करंडीतून रायवळ आणि पायरी विकणारे विक्रेते, हातावर रस देऊन चव दाखवणारी परंपराही सगळी संस्कृती हळूहळू लोप पावत चालली आहे. आज रायवळसारख्या स्थानिक आंब्यांकडे दुर्लक्ष झाल्याने ती झाडं लाकूड म्हणून वापरली जात आहेत. शासन आणि संशोधन संस्थांनी या पारंपरिक जातींकडे पुन्हा लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर ते मुंबई या सर्व भागांना जोडणारा एकच गोड दुवा आहे तो म्हणजे "आंबा" आणि जोपर्यंत या आंब्यावर प्रेम करणारे हात आहेत, तोपर्यंत कोकणची ही गोड परंपरा कधीही मावळणार नाही.