

चिपळूण : शहरात आणि परिसरात अंमली पदार्थांचा वाढता प्रसार रोखण्यासाठी पोलिसांनी मोहीम हाती घेतली आहे. याच दरम्यान सोमवारी सायंकाळी चिपळूण पोलिसांनी गांजा विक्री करणाऱ्या एका तरुणाला रंगेहात पकडून अटक केली. हा प्रकार मुंबई-गोवा महामार्गालगत सवतसडा धबधबा परिसरात घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव राकेश वसंत पडवेकर (रा. पेढे-कुंभारवाडी, चिपळूण) असे आहे.
राकेश हा या परिसरात गांजाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर गुन्हा प्रकटीकरण विभागाच्या पथकाने सवतसडा धबधबा परिसरात सापळा रचला आणि त्याला ताब्यात घेतले. तपासात त्याच्याकडून तब्बल ३२६ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून त्याची बाजारभावानुसार किंमत सुमारे १९,५६० रुपये इतकी आहे.
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश बेले आणि पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक ओम आघाव, हेडकॉन्स्टेबल बुशाल शेटकर, रोशन पवार, संदीप माणके, रूपेश जोगी आणि शैलेश वणगे यांनी सहभाग घेतला.
प्राथमिक चौकशीत राकेश पडवेकरने पोलिसांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पुढील तपासात तो गांजा विक्रीच्या उद्देशाने त्या ठिकाणी आल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी त्याच्यावर अंमली पदार्थ नियंत्रण कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
सध्या निवडणुकीचे वातावरण तापलेले असताना, या घटनेमुळे स्थानिक राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. परिसरात अंमली पदार्थ विक्रीच्या साखळीमध्ये अजून कोणी सहभागी आहे का, याचा तपास पोलीस करीत आहेत. राकेश याने हा गांजा कुणाकडून घेतला आणि कोणाला विकणार होता, हे शोधण्यासाठी चौकशी सुरू आहे.
चिपळूण पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा प्रकारच्या बेकायदेशीर व्यवहारांची माहिती मिळताच ती त्वरित पोलिसांना द्यावी. अंमली पदार्थांच्या विरोधातील लढा केवळ पोलिसांचा नाही, तर संपूर्ण समाजाने एकत्र येऊन अशा गुन्हेगारी प्रवृत्तींचा अंत करावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.