

लांजा : लांजा नगरपंचायत निवडणूक जाहीर होऊन उमेदवारी अर्ज भरण्याचा कालावधी जवळपास संपुष्टात येत असतानाही लांजाच्या निवडणूक आखाड्यात राजकीय पक्षांची सौम्य भूमिका पहायला मिळत होती. मात्र रविवारी महायुतीकडून अधिकृत नावे जाहीर होताच उमेदवारांची होणारी घुसमट अखेर थांबली. लांजा व राजापूरसाठी शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी महायुतीच्या उमेदवारांची रविवारी लांजा येथे नावे घोषित करण्यात आल्याने लांजा नगरपंचायत निवडणूकीच्या आखड्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
शिवसेना - भाजप - राष्ट्रवादी महायुतीकडून पहिल्या टप्प्यातील उमेदवार यादी रविवारी लांजा येथे पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आले. शिवसेना शिंदे पक्षाचे आठ, तर भाजपला एक जागा निश्चित करण्यात आली. लांजा नागरपंचायत निवडणूक रिंगणात उमेदवार देण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून कमालीची शांतता आणि खबरदारी घेण्यात येत होती. मात्र शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी महायुतीने पहिले 9 उमेदवार जाहीर केले. महायुतीकडून उमेदवार जाहीर होताच शहरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. रविवारी महायुतीतर्फे लांजा-राजापूरचे आमदार किरण सामंत यांच्या लांजा येथील निवासस्थानी अयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत लांजा नागरपंचायत व राजापूर नगर परिषद निवडणुकीसाठी अधिकृत उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. या पत्रकार परिषदेला शिवसेना (शिंदे गट) जिल्हाध्यक्ष राहुल पंडित, भाजप जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन, राष्ट्रवादीचे बंटी वळंजू, लांजा-राजापूरचे आमदार किरण सामंत, शिवसेना नेते अविनाश लाड, विधानसभाक्षेत्र प्रमुख सुनील कुरूप, लांजा तालुका प्रमुख गुरुप्रसाद देसाई, राजापूर तालुका प्रमुख प्रकाश कोळेकर, प्रसन्न शेट्ये, महेश उर्फ मुन्ना खामकर, सचिन डोंगरकर, भाजप तालुका अध्यक्ष शैलश खामकर, विराज हरमले, रिपब्लिकन सेनेचे अनिरुद्ध कांबळे, हेमंत शेट्ये आदी उपस्थित होते.
लांजा नगरपंचायत निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी महायुतीकडून जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांमध्ये प्रभाग क्रमांक 1 निधी नीलेश गुरव (शिवसेना), प्रभाग क्रमांक 2 पंढरी बाळकृष्ण माईशेटे (शिवसेना), प्रभाग क्रमांक 3 श्रद्धा संजय तोडकरी (शिवसेना), प्रभाग क्रमांक 4 सानिका समीर जाधव (शिवसेना), प्रभाग क्रमांक 6 योगेश गोपीनाथ कावतकर (शिवसेना), प्रभाग क्रमांक 10 प्रणाली गुरुप्रसाद तेली (भाजप), प्रभाग क्रमांक 13 साक्षी किशोर मानकर (शिवसेना), प्रभाग क्रमांक 14 वैभव यशवंत जाईल (शिवसेना), प्रभाग क्रमांक 17 शिवण्या शैलेश काळे (शिवसेना) असे एकूण शिवसेना 8 तर भाजपला एक उमेदवार निश्चित करण्यात आले.
उर्वरित दुसऱ्या टप्प्यातील यादी लवकरच जाहीर होईल असे शिवसेना जिल्हाध्यक्ष राहुल पंडित यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेत महायुतीकडून राजापूर नगर परिषदेसाठी उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. शेवटी पत्रकारांशी बोलताना भाजप जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, आरपीआय, रिपब्लिकन सेना महायुतीचे सर्वच उमेदवार विजयी होतील व त्यासाठी जबाबदारीने कामाला लागा असा विश्वास व्यक्त केला. यावेळी शिवसेना (शिंदे) भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार), रिपब्लिकन सेना, आरपीआय महायुतीमधील घटक पक्षांचे पदाधिकारी, उपस्थित होते.