

चिपळूण शहर : तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात विशेष कुष्ठरोग रुग्ण शोध मोहीम राबविण्यात येणार असून दि. 17 नोव्हेंबर ते दि 2 डिसेंबरपर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे.
या मोहिमेमध्ये आरोग्य पथकामार्फत घरोघरी जाऊन सर्व महिला व पुरुष यांची शारीरिक तपासणी करून नवीन रुग्ण आढळून आल्यास त्यांना उपचार देण्यात येणार आहे. तसेच संशयित रुग्णांची तपासणी करून वैद्यकीय अधिकारी निश्चित निदान करणार आहेत. या मोहिमेसाठी आरोग्य कर्मचाऱ्यांचे आवश्यक प्रशिक्षण तालुकास्तरावर आणि प्रा. आ. केंद्र स्तरावर घेण्यात आले आहे. मोहिमेची माहिती आणि प्रसिद्धी आशा सेविकांमार्फत करण्यात येत आहे. एकूण 10 लाख 7 हजार 912 लोकसंखेसाठी 93 टीम कार्यरत राहणार असून 186 सदस्य व 19 पर्यवेक्षक तसेच प्रत्येक तपासणी पथकात दोन सदस्य असणार आहेत. एक आशा सेविका आणि एक पुरुष स्वयंसेवक यासोबत असणार आहेत.
शरीरावर न खाजणारा, न दुखणारा फिकट लालसर पांढरा रंगाचा चट्टा असल्यास आरोग्य टीमकडून तपासणी करून घ्यावी. तसेच खासगी रुग्णालयात कुष्ठरोग संशयित रुग्ण आढळून आल्यास संबंधित डॉक्टरांनी आरोग्य विभागास माहिती द्यावी, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. घन:श्याम जांगीड यांनी केले आहे.