

Municipal Election Rajapur Mahavikas Aghadi
राजापूर : राजापूर नगर परिषदेची निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र लढवण्याचा निर्णय आघाडीतील नेत्यांनी आज (दि.८) संयुक्त पत्रकार परिषदेत जाहीर केला. या वेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या चारही पक्षांचे नेते उपस्थित होते.
काँग्रेसच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत माजी आमदार गणपतराव कदम, माजी विधान परिषदेच्या सदस्या अॅड. हुस्नाबानू खलिफे, तसेच शिवसेना (उबाठा) विधानसभा संपर्क प्रमुख अॅड. चंद्रप्रकाश नकाशे आदी उपस्थित होते.
यावेळी माजी आमदार गणपतराव कदम म्हणाले की, पूर्वी राजापूर तालुक्यात शिवसेना आणि काँग्रेस एकमेकांविरुद्ध लढत होती, परंतु आता नियतीने आम्हाला एकत्र आणले आहे. राजापूर नगरपरिषदेची निवडणूक आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच लढवणार आहोत. प्रभागनिहाय जागावाटपाबाबत चर्चा सुरू असून, अंतिम निर्णय उमेदवारी अर्ज सादर करताना स्पष्ट होईल.
कदम यांनी सांगितले की, नगराध्यक्ष पदाचा आघाडीचा उमेदवार निश्चित झाला असून, त्याची घोषणा वरिष्ठ पातळीवरून केली जाईल. या निवडणुकीत सर्व २० जागांवर आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच उमेदवार देणार असून स्पष्ट बहुमत मिळवू, असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे.
त्याचवेळी अॅड. हुस्नाबानू खलिफे यांनीही आघाडीच्या उमेदवारांना स्थानिक सामाजिक संस्थांचा आणि विविध पतसंस्थांचा पाठिंबा मिळत असल्याचे सांगितले. निवडून येणारा उमेदवार हेच आमचे सूत्र असून, आम्ही आघाडी म्हणूनच विजयी होऊ.
काँग्रेसमधील काही कार्यकर्ते शिवसेना शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चेबाबत विचारले असता अॅड. खलिफे म्हणाल्या की, राजकारणात गाठीभेटी होत असतात. त्यावरून पक्षप्रवेश झाला असे होत नाही. आम्ही महाविकास आघाडीत आहोत आणि आघाडी म्हणूनच ही निवडणूक लढवणार आहोत.
शिवसेना (उबाठा) गटाचे राजापूर विधानसभा संपर्कप्रमुख अॅड. चंद्रप्रकाश नकाशे यांनी सांगितले, या निवडणुकीत महाविकास आघाडी सर्व जागांवर विजय मिळवून राजापूर नगरपरिषदेत आघाडीचा झेंडा फडकवेल.
पत्रकार परिषदेत काँग्रेस तालुकाध्यक्ष जितेंद्र खामकर, माजी नगराध्यक्ष ऍड. जमीर खलिफे, शिवसेना (उबाठा) तालुका प्रमुख कमलाकर कदम, नेते रामचंद्र सरवणकर, माजी तालुकाध्यक्ष सुभाष बाकाळकर, अनिल कुडाळी, संजय पवार, अभय मेळेकर, मनसेचे श्री. पवार, आणि काँग्रेस शहराध्यक्ष अजीम जैतापकर यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.