

गणपतीपुळे : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथून गणपतीपुळे येथे देवर्शन व पर्यटनासाठी आलेल्यांपैकी तिघेजण सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास बुडाले. मदतीसाठी आरडाओरड झाल्यानंतर यातील दोघांना वाचवण्यात यश आले असून अमोल गोविंद ठाकरे (25) या युवकाचा मृत्यू झाला आहे. किनार्यावरील जीवरक्षक तसेच मंदिर प्रशासनाकडून वारंवार सूचना देऊनही पर्यटक समुद्रस्नान करताना खबरदारी घेत असल्याचे उघड झाले आहे.
ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील काही मित्र शनिवारी गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आले होते. मंदिरात दर्शन घेतल्यानंतर सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ते सर्वजण मंदिरानजीकच्या समुद्रात उतरले असताना यातील तिघेजण बुडू लागले. यानंतर किनार्यावर आरडाओरड झाल्यावर जीवरक्षकांनी बुडणार्या तिघांपैकी दोघांना (नावे समजू शकलेली नाहीत) किनार्यावर सुरक्षित आणले. मात्र, यातील अमोल गोविंद ठाकरे याचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच जयगड पोसिल घटनास्थळी दाखल झाले आहेत.