Ratnagiri Political News | नेत्यांच्या भांडणात कार्यकर्त्यांचा जाणार ‘बळी’

चिपळुणात गट-तट उफाळले; स्वबळाच्या नार्‍याने उमेदवारच संभ्रमात, कमालीची रस्सीखेच
Ratnagiri Political News
Ratnagiri Political News | नेत्यांच्या भांडणात कार्यकर्त्यांचा जाणार ‘बळी’ file photo
Published on
Updated on

चिपळूण : समीर जाधव

चिपळूण नगरपरिषदेच्या निवडणुकीत यावेळी प्रथमच कमालीची रस्सीखेच निर्माण झाली आहे. मात्र सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे यावेळी नेत्यांमधील गट-तट उफाळून आले असून, कार्यकर्त्यांचा मात्र यामध्ये बळी जाणार आहे. विधानसभा, लोकसभेसाठी गटा-तटात विभागलेल्या कार्यकर्त्यांना एकत्र केले जाते.

आघाडी किंवा महायुतीदेखील होते. कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत नेत्यांमधील गट-तट, वादविवाद कायम राहतात आणि पाडापाडीचे राजकारण घडते. याचे चित्र चिपळूण न.प.च्या निवडणुकीत पाहायला मिळत आहे. यातच नेत्यांच्या वादात कार्यकर्त्यांचा बळी जाणार आहे. हेच सिद्ध करणारी चिपळूणची न.प. निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे.

चिपळूण न.प. निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी 7 उमेदवार रिंगणात असून 28 नगरसेवक पदांसाठी 110 उमेदवार रिंगणात आहेत. यावेळी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस दुभंगली आहे. शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे शिवसेना, तर राष्ट्रवादी अजित पवार आणि राष्ट्रवादी शरद पवार अशी चार छकले झाली आहेत, तर दुसर्‍या बाजूला काँग्रेस, भाजपा, समाजवादी असे पक्ष रिंगणात आहेत.

चिपळूणमध्ये तर आघाडी किंवा महायुती झालेली नाही. आ. भास्कर जाधव यांचा स्वतंत्र गट रिंगणात असून त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाशी हातमिळवणी केली आहे, तर ठाकरे शिवसेनेने स्वबळावर लढण्याचा नारा दिला आहे. नगराध्यक्ष पदासाठी राजू देवळेकर यांना रिंगणात उतरविले आहे, तर आ. जाधव व शरद पवार राष्ट्रवादी पक्षाकडून रमेश कदम रिंगणात आहेत. काँग्रेस स्वबळावर असून सुधीर शिंदे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत, तर भाजपा आणि शिंदे सेनेची युती झाली असून, युतीचे उमेदवार म्हणून उमेश सकपाळ शर्यतीत आहेत.

राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने नगराध्यक्षपदाचा उमेदवार मागे घेतला असला, तरी नगरसेवक पदासाठी 15 उमेदवार रिंगणात आहेत, तर दोन अपक्ष व समाजवादी पक्षाचा उमेदवार नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवित आहे. विधानसभा व लोकसभेसाठी आघाडी किंवा महायुती करणारे पक्ष आता गल्लीतल्या निवडणुकीत मात्र मानपानव जुने वाद रंगवित आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांची फरफट होणार आहे आणि पाडापाडीचे राजकारण रंगणार आहे.

चिपळूणमध्ये 14 प्रभागांसाठी 28 नगरसेवक निवडून जाणार आहे. या प्रत्येक प्रभागात रिंगणात असलेल्या उमेदवारांची अक्षरशः त्रेधातिरपीट उडणार आहे. प्रचाराला कमी दिवस असतानाच नेत्यांमधील वाद, मानपान उफाळून आले आहे. चिपळूणच्या राजकारणात सक्रिय असणारे विद्यमान आ. शेखर निकम हे महायुतीतून बाहेर आहेत तर शिवसेना उपनेते सदानंद चव्हाण आणि भाजपा नेते प्रशांत यादव यांची युती झाली आहे.

दुसर्‍या बाजूला शिवसेना नेते आ. भास्कर जाधव व माजी आ. रमेश कदम यांची आघाडी, तर ठाकरे शिवसेनेचे सचिव विनायक राऊत यांनी स्वतंत्र उमेदवार रिंगणात दिले आहेत. काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सोनललक्ष्मी घाग यांनी काँग्रेसचे पॅनल रिंगणात उतरविले आहे. यामुळे नेते विभागले गेले असून यात कार्यकर्त्यांची ‘गोची’ झाली आहे. प्रत्येक प्रभागात ही समस्या निर्माण झाली असून, कार्यकर्त्यांचा जीव टांगणीला लागला आहे.

यामध्ये प्रत्येक प्रभागात अनेक उमेदवार रिंगणात आले. एकेकाळी एकाच पक्षाचे कार्यकर्ते असणारे आज मात्र परस्परविरोधी उभे ठाकले आहेत. प्रभाग क्र. 1 अ मध्ये तिरंगी, 1-ब मध्ये चौरंगी. प्रभाग 2-ब मध्ये सहा उमेदवार आहेत. प्रभाग 3-अ मध्ये पंचरंगी लढत, 3-ब मध्ये अष्टकोनी लढत, प्रभाग क्र. 4-अ मध्ये तिरंगी, प्रभाग 5-अ व ब मध्ये शिवसेना कार्यकर्त्यांमध्येच सरळ लढत आहे.

Ratnagiri Political News
Ratnagiri News : ‘येऊन येऊन येणार कोण‌’ नाटक लय भारी

प्रभाग 6-अ मध्ये चौरंगी, 6-ब व 7-अ मध्येे पंचरंगी लढत. 7-ब मध्ये तिरंगी लढत, प्रभाग 8-अ व 8-ब मध्ये पंचरंगी लढत. प्रभाग 9-अ मध्ये तिरंगी तर 9-ब मध्ये चौरंगी लढत, प्रभाग 10-अ मध्ये चौरंगी तर 10-ब मध्ये तिरंगी लढत, प्रभाग 11-अ मध्ये चौरंगी लढत तर 11-ब मध्ये अष्टकोनी लढत होणार आहे. प्रभाग क्र. 12-अ व 12-ब मध्ये पंचरंगी लढत, प्रभाग 13-अ मध्ये तिरंगी व 13-ब मध्ये जुन्या-नव्या शिवसेनेमध्येच संघर्ष आहे. प्रभाग 14-अ व 14-ब मध्ये तिरंगी लढत होणार आहे. त्यामुळे कोण कोणाला साथ देणार, कोण कोणाला पाडणार आणि कोण कुणाचा काटा काढणार हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

Ratnagiri Political News
Ratnagiri News : न.प. निवडणुकीचे चित्र आज होणार स्पष्ट

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news