

दीपक कुवळेकर
रत्नागिरी : कौटुंबिक पाठिंब्याशिवाय आणि वास्तवाचे भान नसताना राजकारणात उतरलेल्या एका सामान्य व्यक्तीची ही कथा, आजच्या राजकीय वातावरणावर मार्मिक भाष्य करते. निवडणुकीच्या रणांगणात उतरण्यापूर्वी, माणसाने स्व-विश्लेषण करणे आणि कुटुंबाचा पाठिंबा किती महत्त्वाचा असतो, हे नाटक विनोदी पद्धतीने दाखवून देतो. ‘येऊन येऊन येणार कोण’ हे नाटक प्रेक्षकांना पोट धरून हसवतं आणि त्याचबरोबर, राजकारण किती निर्दयी असू शकतं याचा अनुभवही देतं. रत्नागिरी केंद्रावरील या नाटकाच्या सादरीकरणाला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला.
राजकारणाच्या गमतीजमती आणि कौटुंबिक विरोधाभास मांडणाऱ्या सरदेशपांडे लिखित व भाग्येश खरे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘येऊन येऊन येणार कोण’ या नाटकाचे सादरीकरण सोमवारी राज्य नाट्य स्पर्धेच्या रत्नागिरी केंद्रावर झाले. एका सर्वसामान्य व्यक्तीच्या नगरसेवक बनण्याच्या महत्त्वाकांक्षेवर आधारित या नाटकाने प्रेक्षकांना केवळ हसवलं नाही, तर विचार करण्यासही प्रवृत्त केलं.
पुण्यातील एका मध्यमवर्गीय कुटुंबाची कथा आहे. यातील सुधीर सोसायटीच्या निवडणुकीत एकतर्फी विजय मिळवतो आणि याच यशाच्या नशेत त्याला नगरसेवक निवडणुकीत उभे राहण्याची महत्त्वाकांक्षा निर्माण होते. मात्र, त्याच्या या महत्त्वाकांक्षेला कुटुंबातून, विशेषतः आण्णा व माई या आई-वडिलांचा तीव्र विरोध होतो. तरीही, कुटुंबाच्या विरोधाला न जुमानता तो निवडणुकीत उभा राहण्याचा निर्णय घेतो आणि अखेर कसाबसा कुटुंबाला मनवतो. दुसऱ्या बाजूला मात्र सुधीरच्या बाजूने त्याची बायको माधवी व मुलगा यश हा त्याला कायम पाठिंबा असतेो. निवडणुकीचा प्रचार जोमाने सुरू होतो. मात्र, मतदानाच्या दिवशी जेव्हा निकाल हाती येतो, तेव्हा त्याला केवळ दोनच मते मिळतात. या दोन मतांमुळे तो गोंधळात पडतो आणि विचार करू लागतो, ही दोन मते कोणाची?
नाटकाचा खरा ट्विस्ट इथेच आहे - त्याला मिळालेल्या मतांमध्ये त्याच्या आई-वडिलांचे, बायकोचे किंवा मुलाचे एकही मत नसते. ते मत हे यशच्या मित्राचे असते हे सिद्ध होते. मूळात सुधीरला सोसायटीची निवडणूक एकतर्फी म्हणजे 24 विरूद्ध 0 अशी जिंकतो. असं असलं तरी त्याच्या विरोधात उभे असलेल्या उमेदवाराची मते ही सुधीरलाच पडते. त्याला जाणूनबुजून सोसायटीत सचिव केलेला असतो. ही गोष्ट जेव्हा त्याची माधवी सांगते तेव्हा त्याचे डोळे उघडतात. यापुढे आपण राजकारणात जाणार नसल्याचा निर्धार तो करतो. यातील सर्वच कलाकारांनी उत्कृष्ट अभिनय सादर केला. हलकं-फुलकं विषयावर नाटक असल्याने व ते विविध अंगांनी मांडल्याने प्रेक्षकांना भावले. या नाटकात आण्णा यांची भूमिका भाग्येश खरे, माई - प्रतिभा केळकर, यश - अथर्व करमरकर, माधवी - मधुरा जोशी, सुधीर - गोपाळकृष्ण जोशी यांनी काम केले. तर प्रकाश योजना यश सुर्वे, पार्श्वसंगीत प्रतिक गोडसे, नेपथ्य व रंगभूषा - सत्यजीत गुरव व वेशभूषा - पल्लवी गोडसे यांनी केली होती.