

रत्नागिरी: मुंबई-गोवा महामार्गावरील अपघात सत्र काही थांबता थांबत नाही. गुरुवारी सायंकाळी 5 वा. सुमारास हातखंबा येथील तीव्र उतारात पुन्हा एक डंपर पलटी होऊन अपघात झाला. बुधवारी सकाळी या परिसरात ट्रेलर उलटून अपघात झाल्याची घटना झाली होती.
त्या अपघातामुळे तब्बल अडीच तास मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती. त्यानंतर गुरुवारी पुन्हा हा अपघात झाला. त्यामुळे महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गुरुवारी सायंकाळी या रस्त्यावर जाणार्या चालकाचा डंपरवरील ताबा सुटला.
त्यामुळे डंपर रस्त्याच्या मध्यभागी उलटला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, डंपर उलटल्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केले. दरम्यान, ग्रामीण पोलिसही घटनास्थळी पोहोचले होते.