

कडवई : कडवईतील उभीवाडी व आकरवाडी परिसरात अज्ञात चोरट्यांनी दोन स्वतंत्र घरफोड्या करत तब्बल 3 लाख 55 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार 21 ते 22 नोव्हेंबर या दरम्यान घडला.
पहिल्या घटनेत फिर्यादी रोजिना इरफान जुवळे (रा. उभीवाडी, कडवई) यांच्या राहत्या घराचे कुलूप चोरट्यांनी कोणत्या तरी हत्याराच्या सहाय्याने तोडले. घरात घुसून त्यांनी 60 हजार रुपये रोख, तसेच 35 ग्रॅम वजनाचे 2 लाख 45 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले.
यानंतर चोरट्यांनी त्याच परिसरातील शेजारील मुराद अली काझी (रा. आकरवाडी, कडवई) यांच्या घराचेही कुलूप तोडले. घरातील कपाटातून होंडा अॅक्टिव्हा या दुचाकीची चावी हातात घेतली. त्यानंतर घराच्या कंपाऊंडमध्ये उभी असलेली निळ्या रंगाची 50 हजार रुपये किंमतीची होंडा अॅक्टिव्हा (क्र. एमएच-02- जीएफ- 6159) गाडी चोरट्यांनी घेऊन पोबारा केला.
अशाप्रकारे दोन्ही घरांतील एकूण 3 लाख 55 हजार रुपये किमतीचा माल चोरीस गेला आहे. याप्रकरणी 23 नोव्हेंबर रोजी संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी पंचनामा करून सीसीटीव्ही फुटेज, संशयित हालचाली व स्थानिक माहितीच्या आधारे तपास सुरू केला आहे.