

चिपळूण : कोळकेवाडी येथील दोघांनी सुमारे 40 एकरावर पारंपरिक शेतीला छेद देत ‘ऑरगॅनिक शेती’चा पॅटर्न राबवून कोकणातील शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे. या शेतीबरोबरच 45 गीरगायींचा गोठा उभारून दुग्ध व्यवसायदेखील यशस्वी केला आहे. कोकणातील शेतकऱ्यांनी पडीक क्षेत्रात व्यावसायिकतेच्या दृष्टीने शेती करावी, असे आवाहन कोळकेवाडी येथील प्रगतिशील शेतकरी गिरीश साठे, अतुल भागवत यांनी केले आहे.
गिरीश साठे यांच्या मालकीच्या क्षेत्रात या दोघांनी एकत्र येत पाच वर्षांपासून ‘ऑरगॅनिक शेती’ केली आहे. शेतीसाठी कृषी विभागाच्या सहकार्याने 55 लाख लिटर क्षमतेची तीन शेततळी उभारली आहेत, तर शेतीला पाणीपुरवठा होण्याच्या दृष्टीने चार इलेक्ट्रीक ट्रान्सफॉर्मर उभे केले. यातून सुमारे 40 एकरावर ‘ऑरगॅनिक शेती’ बहरली आहे.
ऑरगॅनिक शेतीबरोबरच 40 एकराच्या क्षेत्रात 45 गीरगायींचा गोठा उभारला आहे. गाईंच्या चाऱ्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. गाईंचे दूध वाशिष्ठी डेअरी प्रकल्पात संकलित जाते. या उत्पादनातून गाईंचे संगोपन व्यवस्थापन व इतर खर्चाचा ताळमेळ बसत आहे, अशी माहिती या शेतकऱ्यांनी दिली.
कोळकेवाडी येथे दोघांनी 21 एकरांवर बांबू लागवड व 9 एकरांवर ऊस लागवड व 4 एकरांवर आल्याची लागवड केली आहे. ऊस लागवडीतून गूळ उत्पादन घेतले जाते. यासाठी युनिटचीदेखील उभारणी करण्यात आली आहे. गेल्यावर्षी तब्बल 29 टन गूळ उत्पादित केले गेले. रत्नागिरी, चिपळूण, गुहागर, दापोली, महाड, खेड येथे ’गुळामृत’ या ‘ब्रँड’ने गुळाची विक्री करण्यात आली. वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टस, चिपळूण आयोजित कृषी महोत्सवातदेखील या शेतकऱ्यांना स्टॉल्स उपलब्ध करण्यात आला होता. या शेतकऱ्यांनी आपल्या शेतीतील गूळ, आले याची चांगलीच विक्री केली. यातून या चांगले उत्पन्न मिळाले. एकंदरीत 29 टन गूळ विक्रीतून सुमारे 26 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. गेल्या वर्षी केवळ अर्धा एकरावर आल्याचे उत्पादन घेण्यात आले होते. यातून सुमारे 4 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. यावर्षीचे आल्याचे क्षेत्र वाढवण्यात आले असून फेब्रुवारी महिन्यात हैदराबाद, सुरत, बेळगाव यासारख्या शहरात आले विक्रीसाठी पाठवले जाणार असल्याची माहिती साठे व भागवत यांनी दिली.