

चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर कळंबस्ते फाटा येथे भरधाव वाहनाने धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघातात एक पादचारी गंभीर जखमी झाला आहे. विशेष म्हणजे अपघात घडवून वाहनचालक घटनास्थळी न थांबता पसार झाला आहे. ही घटना दि. 28 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 7.50 वाजण्याच्या सुमारास घडली.
मुंबईकडून गोवा बाजूकडे जाणाऱ्या लेनवर मौजे कळंबस्ते फाटा येथे काळ्या रंगाची हुंडाई कंपनीची क्रेटा चारचाकी गाडी हयगयीने व भरधाव वेगात चालवली जात होती. या वाहनाने रस्ता ओलांडत असलेल्या निजामुद्दीन हसनअली शेख (36, रा. निरबाडे मोहल्ला, ता. चिपळूण) यांना जोरदार धडक दिली. या अपघातात निजामुद्दीन शेख यांच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली आहे. मात्र अपघातानंतर संबंधित वाहनचालक घटनास्थळी न थांबता पसार झाला. या प्रकरणी जखमीचे चुलत भाऊ अब्दुल रऊफ कुदबुद्दीन शेख (49, रा. निरबाडे मोहल्ला, चिपळूण) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार दि. 2 जानेवारी चिपळूण पोलिस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार वाहनचालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू असून महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे.