

Dragon boat accident Ganpatipule
गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे समुद्रात आज गुरुवार( दि. 24) एप्रिल रोजी सायंकाळच्या दरम्यान सुरेश जेटानंद गावराणी (वय 49) या कोल्हापूर येथील प्रौढाचा ड्रॅगन बोटीवरून पडून मृत्यू झाला. ही घटना आज गुरुवारी सायंकाळी पावणे सहाच्या दरम्यान गणपतीपुळे समुद्रात घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, ताराबाई पार्क, कापसे जिल्हा कोल्हापूर या ठिकाणाहून सुरेश जेटानंद गावराणी व त्यांची फॅमिली गणपतीपुळे येथे देवदर्शन व पर्यटनासाठी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास आले होते. त्या दरम्यान ते आपल्या फॅमिलीसह सायंकाळी गणपतीपुळे समुद्रात ड्रॅगन बोटीचा आनंद घेण्यासाठी ते समुद्रात गेले असता ड्रॅगन वरून हात सटल्याने ते खाली समुद्रात पडले.
यावेळी समुद्रातील मोठ्या लाटेमुळे ते पाण्यात बुडू लागले. या ड्रॅगन बोटीवर त्यांनी सुरक्षिततेसाठी जॅकेट घातले होते. परंतु तरीसुद्धा ते पाण्यात बुडू लागल्याचे निदर्शनास येताच तात्काळ स्थानिक बोट व्यवसायिक आणि समुद्रा बाहेर असलेल्या जीव रक्षकांनी त्यांना तात्काळ पाण्याबाहेर काढले.
त्यानंतर गणपतीपुळे देवस्थानच्या ॲम्बुलन्सने त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड येथे आणण्यात आले. यावेळी त्यांची प्राथमिक तपासणी केली असता वैद्यकीय अधिकाऱ्यानी त्यांना मृत घोषित केले.
मृत झालेल्या सुरेश गावरानी यांच्यासोबत त्यांची पत्नी ,त्यांची सासू ,मुलगा व मुलगी अशी संपूर्ण फॅमिली फिरण्यासाठी आली होती. मात्र त्यांच्या अपघाती निधनाने मोठी हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान या घटनेचा अधिक तपास जयगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गणपतीपुळे पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस कर्मचारी करीत आहेत.