

अनुज जोशी
खेड : तालुक्यातील जगबुडीसह नारिंगी, चोरद व अन्य नदीपात्रात गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. नद्यांमध्ये मानवनिर्मित कचरा फेकणाऱ्यांची संख्यादेखील वाढत आहे. नदीच्या पात्रात साचलेल्या वाळूच्या टेकड्यामुळे नैसर्गिक संकट असताना शासनाचा संबंधित विभाग मात्र याबाबत उपाययोजना करताना दिसत नाही. गेल्यावर्षी झालेल्या अतिवृष्टीत सह्याद्रीतून वाहून आलेला हजारो टन गाळ यावर्षीच्या पावसाळ्यात नदी किनाऱ्यावरील वस्त्यांची डोकेदुखी ठरू शकतो. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
खेड तालुक्यातील बारमाही नद्या गेल्यावर्षी अतिवृष्टीमध्ये हजारो टन गाळ वाहून आल्यामुळे गाळाने भरल्या आहेत. जगबुडी या प्रमुख नदीमध्ये तर खाडी परिसरात मोठ्या प्रमाणात गाळाची बेटे तयार झाली आहेत. त्यातच या नदीच्या किनाऱ्यावरील लोकवस्त्यातून नदीपात्रात कचरा फेकला जात असल्याने नदीपात्रात कचरा तरंगू लागला आहे. नदीपात्र कचऱ्याने भरले आहे. जगबुडी नदी पात्रात मगरींचा वावर असून गेल्या वर्षभरात काही मगरी मेल्या आहेत. प्रदूषण वाढल्यानेच त्यांचा मृत्यू झाल्याची चर्चा आहे. नदीपात्रात रात्री अपरात्री कचरा फेकणे यांचे प्रमाण वाढले आहे. फळ विक्रेते, चिकन-मटण, मासे विक्रेते नदीपात्रात कचरा फेकत असल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र नगरपरिषद प्रशासन सध्या कारवाईसाठी पुढाकार घेत नाही. जगबुडी नदी पात्रात कचरा वाढल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
कचऱ्यामुळे नदीपात्र पुन्हा बकाल झाले आहे. जगबुडी नदीपात्रात केवळ मानवनिर्मित कचराच साचलेला नसून पावसाळ्यात सह्याद्रीच्या रांगांतून मोठ्या प्रमाणात वाहून आणलेला गाळ, ओंडके व पालापाचोळा यांचा देखील त्यात समावेश आहे. जगबुडी नदी खेड शहरानजीक खाडीला जोडली जाण्याच्या शेवटच्या टप्प्यात प्रवाहित होते. त्यामुळे तिचा प्रवाह संथ होतो. या टप्प्यात नदीपात्रातील वळणाच्या ठिकाणी नदीने वाहून आणलेला गाळ साचून अनेक लहान-मोठी बेट तयार झाली असून त्या ठिकाणी नदीपात्रात ओहोटी काळात कचरा साचून राहतो. भरतीच्या काळात खाडी भागात गाळाच्या बेटात साचलेला कचरा जगबुडी नदी पात्रात पुन्हा वाहून येतो. त्यामुळे भरतीच्या कालावधीत शहरानजीक जगबुडी नदीपात्रात कुजलेला पाला पाचोळा व मानवनिर्मित फेकलेला कचरा यांचे ढीग पाण्यावर तरंगताना पहाला मिळत आहेत.