

मुंबई : दिल्लीप्रमाणे मुंबईतील हवेची गुणवत्ता ढासळल्याबद्दल नाराजी व्यक्त करत, हायकोर्टाने पालिका प्रशासनाला खडे बोल सुनावले होते. त्यानंतर अवघ्या काही तासातच मुंबई महानगरपालिकेने वांद्रे येथे हायकोर्टाच्या संकुलासाठी पाडकाम करण्यात येणाऱ्या इमारतीमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्याचे दिसून आले. त्यामुळे पालिकेने हायकोर्टाचे बांधकाम करणाऱ्या ठेकेदाराला नोटीस बजावली आहे.
दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढले असून दिल्लीकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अशी अवस्था मुंबईची करू देऊ नका, असे हायकोर्टाने महापालिकेला सुनावले होते. त्यानंतर पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या आदेशानुसार पालिकेच्या सांताक्रुझ पूर्व विभागाने बुलेट ट्रेनच्या सुरू असलेल्या कामासह वांद्रे पूर्वेला सुरू असलेल्या अन्य कामांची पाहणी केली. यात अनेक ठिकाणी वायू प्रदूषण नियमावलीचे उल्लंघन करण्यात आल्याचे दिसून आले.
वांद्रे पूर्व येथे नव्याने उभारण्यात येणाऱ्या हायकोर्टाच्या इमारतीसाठी जुन्या इमारती पाडत असताना मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्याचे दिसून आले. त्यामुळे पालिकेने तातडीने या इमारतीचे काम करणाऱ्या ठेकेदाराला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
बुलेट ट्रेनचे काम थांबवले
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाने वेग पकडला आहे. या प्रकल्पाला मुंबई महानगरपालिकेने यापूर्वी प्रदूषण नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावली होती. मात्र त्यानंतरही प्रदूषणाच्या नियमांचे पालन न केल्याने अखेर पालिकेच्या एच पूर्व विभागाकडून प्रकल्पाला काम थांबवण्याची नोटीस बजावण्यात आली.
या प्रकल्पाचे काम करताना प्रदूषण होणार नाही यासंदर्भात असलेल्या नियमांचे पालन करून उपाय योजनांची अंमलबजावणी करावी, असे निर्देश दिले आहेत. जोपर्यंत उपाययोजना केल्या जाणार नाही तोपर्यंत काम सुरू करण्यास परवानगी दिली जाणार नसल्याचे पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे हा प्रकल्प रखडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.