Khadpoli Pimpli bridge collapsed : चिपळूणमधील खडपोली पिंपळी पूल रात्री कोसळला, वाहतूक बंद
Khadpoli Pimpli bridge in Chiplun collapsed at night, traffic closed
चिपळूण : पुढारी वृत्तसेवा
चिपळूण तालुक्यातील पिंपळी नंदिवसे येथील खडपोली पूल शनिवारी रात्री 10.30 वाजता कोसळला. कोणतीही जीवितहानी झाली नाही. पुलावरून सर्व प्रकारची वाहतूक बंद करण्यात आली असून, अलोरे पोलीस ठाणे हद्दीतील पेढांबे ते खडपोली जाणाऱ्या पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात आली आहे.
हा पूल सार्वजनिक बांधकाम विभागाने एम आय डी सी कडे हस्तांतरित केलेला होता. सुमारे 60 वर्षे जुना पूल असून तो धोकादायक झाला होता. शनिवारी दुपारी तो खचल्याने या पुलावरून वाहतूक बंद करण्यात आली होती. दरम्यान रात्री हा पूल कोसळला.
पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी ५ जुलै रोजी चिपळूण येथील 'सहकार भवन'मध्ये खडपोली आणि खेर्डी एमआयडीसी नागरिकांच्या समस्यांबाबत विशेषतः पुलांच्या बांधकामाबाबत बैठक घेतली होती. त्यावेळी रस्ता, पूल यासाठी २७ कोटी मंजूर केले होते.
पावसाळ्यामध्ये निविदा प्रक्रिया पूर्ण करुन, पावसाळ्यानंतर काम सुरु झाले पाहिजे. खडपोली आणि खेर्डी एमआयडीसीसंदर्भातील समस्या मार्गी लावा, अशा सूचनाही त्यांनी त्यावेळी दिल्या होत्या.

