

रत्नागिरी: जिल्हा शासकीय रुग्णालयाची रुग्णवाहिका आणि दुचाकी यामध्ये कारवांचीवाडी रस्त्यावर भीषण अपघात झाला. यामध्ये दुचाकी चालकासह पत्नी मुलगा-मुलगी अशी चारजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, अपघाताची ही घटना रविवार, दि. 30 नोव्हेंबर रोजी दुपारी 3.45 वा. सुमारास रत्नागिरी-हातखंबा मुख्य रस्ता आणि कारवांचीवाडी येथून येणारा फाटा येथे घडली.
जिल्हा रुग्णालयाच्या 108 रुग्णवाहिकेवर असलेला चालक चेतन मयेकर (रा. वांद्री) हा 108 रुग्णवाहिका (क्र. एमएच-08-एपी -3894) वाहिकेतील नऊ जणांच्या स्टाफला घेऊन जिल्हा रुग्णालयाकडे येत होते. कारवांचीवाडी फाट्याजवळ आल्यावर अचानकपणे मुख्य रस्त्यावर येणारी दुचाकी (एमएच-09 जीवाय 1562) ही समोर आल्याने अपघात झाला.
रुग्णवाहिकेच्या पुढच्या बॉनेटला दुचाकी धडकली. या अपघातामध्ये दुचाकी चालक किरण रामचंद्र नवले (वय 30) मयुरी किरण नवले (30), मुलगा-श्रेयस व मुलगी-श्रद्धा (सर्व राहणार परेल, नीनाई-शाहूवाडी-कोल्हापूर) ही गंभीर जखमी झाली. यामध्ये श्रेयस व किरण यांच्या डोक्याला, तर मयुरी-श्रद्धा यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.
चौघांनाही उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती. पुढील तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.