

मंडणगड : आंबडवे-लोणंद राष्ट्रीय महामार्गावर शिरगाव बस स्टॉप या ठिकाणी गुरुवारी सायकांळी 4 वाजता दोन दुचाकीमध्ये एकमेकांना ध़डक देत गंभीर अपघात झाला. या अपघातात पाचजण गंभीर जखमी झाले. यावरुन गेल्या आठवड्यात सुरु झालेली अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नसल्याचे 26 व 27 नोव्हेंबर रोजी सलग दोन दिवसात झालेल्या अपघातांवरुन दिसून येते. एकाच ठिकाणी नजीकच्या काळातील गुरुवारचा हा चौथा अपघात आहे.
या अपघातात यश पाटील (सोवेली), मनोज पवार (सडे), अक्षय मर्चंडे (मंडणगड), प्रथमेश जाधव (बोरघर), मुराद अंतुले (पेवे) हे पाचजण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. पोलीस घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा केला. तालुक्यात नव्याने बांधकाम सुरु असलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे बहुतांश काम पूर्णत्वास गेलेले असल्याने सर्वच वाहनांच्या वाहतुकीच्या वेगात कमालीची वाढ झाली आहे.
म्हाप्रळ ते आंबडवे या सुमारे चाळीस किलोमीटर इतक्या अंतरात महामार्गास जोडले जाणारे अंतर्गत गाव रस्ते, शाळा, मंदिरे, रुग्णालये, जास्तीच्या रहदारीची ठिकाणी, बाजारपेठा इत्यादी वर्दळीच्या ठिकाणी वाहनांची वेग मर्यादा कमी असावी, याकरिता आवश्यक असणारे गतिरोधक, दिशा दर्शक फलक, सूचना फलक याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने कोणतेही लक्ष दिलेले नाही.
त्यामुळे वाहनचालक भरधाव वेगाने गाड्या चालवित आहेत. त्यामुळे एस.टी. स्टॉप असलेल्या वीसहून अधिक ठिकाणी ज्येष्ठ नागरिक, रुग्ण, महिला व पुरुष नागरिकांना भरधाव वेगाने जाणार्या वाहनांचा धोका निर्माण झाला आहे. महामार्गाच्या निर्मितीत पादचार्यांकरिता रस्ता क्रॉस करण्याची कोठे सोय नाही याचबरोबर नमूद ठिकाणी महामार्गास पर्यायी पादचारी मार्ग नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
राष्ट्रीय महामार्गावर निरुपायाने पायी चालत जाणार्या नागरिकांच्या सुरक्षेकरिता प्रशासन व संबंधीत यंत्रणांनी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी सातत्याने झालेल्या अपघातानंतर पुढे आली आहे.