

देवरुख: संगमेश्वर तालुक्यातील कडवई उभीवाडी आणि आकरवाडी येथे चोरट्याने भरदिवसा बंद घराचे कुलूप तोडून मोठी चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घरफोडीत चोरट्याने रोख रक्कम, सोन्याचे दागिने आणि घराच्या आवारात उभी केलेली दुचाकी असा एकूण 3 लाख 55 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. या प्रकरणी संगमेश्वर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना 21 रोजी दुपारी दीड वाजल्यापासून ते 22 रोजी दुपारी 12 वाजेच्या दरम्यान घडली. फिर्यादी रोजिना इरफान जुवळे (49, रा. कडवई उभीवाडी) या आपल्या घराला कुलूप लावून गेल्या होत्या. या संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा कोणत्यातरी हत्याराने तोडून घरात प्रवेश केला.
चोरट्याने घरातील कपाटात ठेवलेली 60 हजार रुपयांची रोकड आणि 2 लाख 45 हजार रुपये किमतीचे 35 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले. तसेच, फिर्यादी यांचे शेजारी राहणारे साक्षीदार मुराद अली काझी यांची होंडा अॅक्टिवा ही दुचाकी फिर्यादी यांच्या घराच्या परिसरात उभी होती.
चोरट्याने घरात प्रवेश केल्यानंतर कपाटात असलेली या गाडीची चावी शोधून काढली आणि त्या चावीच्या सहाय्याने घराबाहेर उभी केलेली मुराद अली काझी यांची50 हजार रुपये किमतीची निळ्या रंगाची होंडा अॅक्टिवा चोरून नेली. सोन्याचे दागिने आणि दुचाकी मिळून 3 लाख 55 हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.
ही चोरीची घटना लक्षात आल्यानंतर रोजिना जुवळे यांनी 23 रोजी संगमेश्वर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञातावर गुन्हा दाखल केला आहे. भर वस्तीत आणि दिवसाढवळ्या घडलेल्या या प्रकारामुळे कडवई परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून पोलिस अधिक तपास करत आहेत.