

राजापूर : राजापूर तालुक्यात गुन्हेगारांनी पुन्हा एकदा पोलिसांना आव्हान देत आपला धुमाकूळ सुरूच ठेवला आहे. काही दिवसांपूर्वी रायपाटण पोलीस हद्दीत वृद्ध महिलेची हत्या होऊनही मारेकरी सापडले नसतानाच, आता त्याच हद्दीतील कोळवणखडी येथे शनिवारी (दि. २२) मध्यरात्री दरोडेखोरांनी एका घरात घुसून लुटमारीचा प्रयत्न केल्याने परिसरात तीव्र खळबळ उडाली आहे.
कोळवणखडी येथील सदानंद शांताराम मोरे (वय ५५) यांच्या घरी शनिवारी रात्री सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत ५ ते ६ दरोडेखोरांच्या टोळक्याने मोरे यांच्या घराच्या मागच्या खिडकीतून थेट घरात प्रवेश केला.
घरात मौल्यवान वस्तूंचा शोध घेत असताना अचानक मोरे कुटुंब जागे झाले. कुटुंबाने गोंधळ आरडाओरडा सुरू करताच, दरोडेखोरांनी घरातच असलेला कोयता आणि धारदार हत्यारे हातात घेत कुटुंबाला धमकावले. ‘पैसे द्या नाही तर जीव गमवावा लागेल. पोलिसात गेलात तर संपवून टाकू’, अशा धमक्या देत त्यांनी कुटुंबाकडे पैसे आणि दागिन्यांची मागणी केली.
अचानक घडलेल्या या घटनेने भांबावून गेलेल्या मोरे कुटुंबाने दरोडेखोरांसोबत वाद न घालता जीव वाचवण्याच्या उद्देशाने त्यांना पैसे दिले. दरोडेखोरांनी त्यांचे तोंड कानटोप्यांचा वापर करून झाकले होते. त्यामुळे त्यांची ओळख पटू शकली नाही. भेदरलेल्या मोरे कुटुंबाने मुलींनी डब्यात बचत केलेली, सुमारे १६०० रुपयांच्या आसपासची रक्कम दरोडेखोरांच्या हातात ठेवली. दरम्यान, मोरे कुटुंबाच्या आरडाओरड्याचा आवाज ऐकून आजूबाजूचे गावकरी घराच्या दिशेने येत असल्याचे लक्षात येताच, हे टोळकं घाईघाईने अनुस्कुरा मार्गाने गाडीतून पसार झाले. रात्रीचा अंधार आणि धूसर नंबर प्लेटमुळे दरोडेखोरांच्या वाहनाचा कोणताही पुरावा अद्याप मिळालेला नाही, असे कुटुंबाने सांगितले.
या घटनेची तक्रार सदानंद मोरे यांनी रात्री २ वाजता रायपाटण पोलीस दूरक्षेत्रात नोंदवली आहे. राजापूर पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुधीर उबाळे पुढील तपास करत आहेत. चोरीच्या उद्देशाने हा दरोडा टाकण्यात आला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
काही दिवसांपूर्वीच रायपाटण पोलीस हद्दीत एका घरात घुसून वृद्ध महिलेची हत्या झाली होती. या घटनेला महिना उलटून गेला तरीही पोलीस मारेकऱ्यांचा माग काढू शकलेले नाहीत. पहिल्या गुन्ह्याचे उत्तर मिळण्याआधीच दुसरी गंभीर दरोड्याची घटना घडल्याने राजापूर तालुक्यात भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी तातडीने या टोळक्यांचा माग काढून कडक कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत.