

रत्नागिरी : पावसाने दडी मारल्यानंतर मागील चार दिवसांपासून जिल्ह्यात पावसाची दमदार बॅटिंग सुरू झाली आहे. चिपळूण, संगमेश्वर, दापोली, मंडणगड, खेड तालुक्यांत पाऊस धो-धो पडत आहे. पावसामुळे जिल्ह्यातील खेड-भरणे पूल येथील जगबुडी नदी 5.20 मीटर पाणी तर राजापूर येथील कोदवली नदीमध्ये 6 मीटर पाणी आल्यामुळे या दोन्ही नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यास रविवारी ऑरेंज तर सोमवारसाठी ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
ऑगस्ट महिन्यास सुरुवात झाली असून, पहिल्या आठवड्यात पावसाने दडी दिली होती. त्यामुळे काही ठिकाणी पावसाची रिपरिप सुरू होती तर काहीठिकाणी सूर्यनारायणाचे दर्शन होत होते. मात्र, मागील चार दिवसांपासून कोकणात पावसाने पुन्हा जोरदार एन्ट्री घेतलेली आहे. जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले आहे. रत्नागिरीसह दोन तालुके वगळल्यास सर्वच तालुक्यांत जोरदार पाऊस पडत आहे. नद्या ओसंडून वाहत आहेत. खेड, राजापूर येथील दोन्ही नद्यांनी इशारा पातळी गाठली आहे. येत्या दोन दिवसात जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
पावसामुळे भात, नाचणी शेतीला संजीवनी मिळाली असून उर्वरित भात लावणी ही जिल्ह्यातील पूर्ण झाली आहे. मंगळवार, बुधवारी जिल्ह्यास ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पावसामुळे शहरातील रस्त्यांची अक्षरश: वाट लागली असून सखल भागात, खड्यात पाणीच पाणी साचले आहे. साळवी स्टॉफ, जे. के. फाईल यासह विविध भागातील रस्त्यात पाणी साचत असल्यामुळे वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागता आहे.
रस्त्यांची अक्षरश: वाट लागली असून किरकोळ अपघात होत आहे. काही ठिकाणी मलमपट्टी म्हणून नगर परिषदेच्या वतीने खड्डे बुजवण्यात येत आहे.