

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात 31 जुलैअखेर 5 लाखांहून अधिक रेशनकार्ड धारकांनी ई-केवायसी करून घेतली आहे. आता मशिनद्वारे ई-केवायसी करण्याची मुदत संपली असली, तरी मेरा केवायसी व आधार फेस आरडी सर्व्हीस अॅप या मोबाईल अॅपद्वारे रेशनकार्डला ई-केवायसी होत असून, राज्यभरातील कार्डधारक या अॅपचा वापर करीत आहेत. जिल्ह्यातील 66 जणांनी एकाच दिवशी ई-केवायसी केली आहे. अद्याप 2 लाख 70 हजार 108 कार्डधारकांनी ई-केवायसी पूर्ण केलेली नाही. जरी मुदत संपली असली तरी जिल्ह्यासह राज्यभरातील रेशनकार्डधारकांनो मोबाईल अॅपचा वापर करून आपली ई-केवायसी पूर्ण करून घ्यावी, अन्यथा धान्य बंद होण्याची शक्यता आहे.
रत्नागिरी जिल्ह्यासह राज्यभरात रेशन दुकानांसाठी ई-केवायसी काम महत्वाचे आहे. केवायसी करण्यासाठी 31 जुलैपर्यंत मुदत होती. त्यामुळे जिल्ह्यात तब्बल 5 लाखांहून अधिक रेशनधारकांनी ई-केवायसी पूर्ण केली आहे. तर 20 हजारांहून अधिक जणांची ई-केवायसी रिजेक्ट करण्यात आली आहे, तर 3 लाख 66 हजार 728 आधार पडताळणी पेंडींग आहे. दरम्यान, आता पॉशमशिनवर ई-केवायसीची मुदत संपली असून, अद्याप शासनाकडून मुदतवाढीची तारीख जाहीर झालेली नाही. मात्र आता दोन मोबाईल अॅपद्वारे रेशनकार्ड धारक ई-केवायसी करीत आहेत. जिल्ह्यातील 66 जणांनी ई-केवायसी पूर्ण केली आहे. त्यामुळे ज्या रेशनकार्ड धारकांनी ई-केवायसी बाकी आहे त्यांनी दोन मोबाईल अॅपचा वापर करून ई-केवायसी पूर्ण प्रक्रिया करावी असेही आवाहन जिल्हा पुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले.
राज्यभरातील रेशनकार्ड धारकांनी मोबाईल अॅपद्वारे ई-केवायसी पूर्ण करण्यास सुरुवात केली आहे. एकाच दिवशी 2 हजार 647 जणांनी ई-केवायसी पूर्ण केली आहे. पुणे, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, धुळे, जळगाव, नाशिक,रायगड, सोलापूर, सिंधुदुर्गसह इतर जिल्ह्यात मोबाईलद्वारे ई-केवायसी करण्यात येत आहे.