Ratnagiri News | उड्डाणपूल कापसाळपर्यंत नेण्यासाठी हवा निधी

समस्यांची मंत्र्यांकडे मांडणी; महामार्ग प्राधिकरणाने उर्वरित कामांचे अंदाजपत्रक बनविले
चिपळूण : सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याशी चर्चा करताना आ. शेखर निकम. सोबत उमेश सकपाळ, शशिकांत मोदी, महायुती घटक पक्षातील पदाधिकारी.
चिपळूण : सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याशी चर्चा करताना आ. शेखर निकम. सोबत उमेश सकपाळ, शशिकांत मोदी, महायुती घटक पक्षातील पदाधिकारी.Pudhari Photo
Published on
Updated on

चिपळूण शहर : चिपळूण शहरातून जाणार्‍या मुंबई-गोवा महामार्गाच्या बहादूरशेख ते प्रांत कार्यालयापर्यंत उड्डाण पुलाची लांबी कापसाळपर्यंत न्यावी व त्यासाठी आवश्यक असणारा निधी मंजूर व्हावा, असे पत्र आ. शेखर निकम यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना नुकतेच दिले आहे. या संदर्भात त्यांनी ना. भोसले यांची वेळ घेऊन वस्तुस्थिती सांगण्याबरोबरच निधी व पुलाच्या मंजुरीसाठी चर्चा केली.

आ. निकम यांनी ना. शिवेंद्रराजे भोसले यांना दिलेल्या पत्रात असे नमूद केले आहे की, राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 (मुंबई-गोवा महामार्ग) हा कोकणच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. चिपळूण शहराच्या सीमेअंतर्गत या महामार्गाचा काही भाग येत आहे. त्यापैकी उड्डाण पुलाच्या स्वरूपात काही भागात हे काम सुरू आहे. उर्वरित भाग हा जमिनीवरून जात आहे. परिणामी, चिपळूण शहरात अनेक गंभीर अडचणी निर्माण झाल्या आहेत. सद्यस्थितीतील प्रस्तावित प्रगतिपथावर असलेला पूल शहरातील दाट लोकवस्ती, सामाजिक व शासकीय रचना, न्यायालय, शाळा, महाविद्यालये, वसतिगृहे, रुग्णालये तसेच अल्पसंख्याक व मागासवर्गीय नागरिकांची रहिवास वसाहत यांना बाधित करीत आहे. परिणामी, अपघातांचे प्रमाण वाढीस लागले आहे.

गेल्या काही महिन्यांत अनेक गंभीर अपघात घडले आहेत. यामध्ये काहींचा मृत्यू तर काहीजण कायमस्वरूपी अपंग झाले आहेत. प्रस्तावित पूल संपल्यानंतर वाहतूक जमिनीवरून सुरू झाल्याने वाहनांच्या वेगावर नियंत्रण राहत नाही. तसेच शहरातील विविध महत्त्वाच्या ठिक़ाणी पोहोचण्यासाठी कोणताही सुसज्ज अ‍ॅप्रोज रोड किंवा सर्कल उपलब्ध नसल्याने अपघातांचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

राष्ट्रीय महामार्ग विभागाने उर्वरित उड्डाण पुलासाठी अंदाजपत्रक तयार केल्याची माहिती मिळत आहे. त्यानुसार सुमारे 110 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. तरी, वरील घटना लक्षात घेता उड्डाण पुलाची लांबी कापसाळपर्यंत नेण्यासाठी आवश्यक निधी व मान्यता तातडीने मिळावी व शहराच्या सुरक्षेची काळजी घेतली जावी. ही मागणी संपूर्ण शहरवासीयांबरोबरच शहरातील लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था यांची असून या मागणीचा गांभीर्याने विचार होऊन निधीस मंजुरी मिळावी, अशा स्वरूपाचे पत्र आ. निकम यांनी दिले आहे. यावेळी चर्चेदरम्यान तात्पुरत्या उपायांमध्ये आवश्यक ठिकाणी गतिरोधक, पागनाका येथे सिग्नल व्यवस्था, कायमस्वरूपी पोलिस बंदोबस्त तसेच पागनाका येथे फ्लाय फूट ब्रिजची व्यवस्था तातडीने करण्याची मागणी चर्चेदरम्यान करण्यात आली.

यावेळी शिवसेना शहर प्रमुख उमेश सकपाळ, भाजप शहराध्यक्ष शशिकांत मोदी, चिपळूण व्यापारी महासंघटनाचे अध्यक्ष किशोर रेडीज, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष व महायुती समन्वयक उदय ओतारी, भाजपचे रामदास राणे, अर्बन बँक संचालक दीपा देवळेकर, युवासेना प्रमुख निहार कोवळे, उप शहरप्रमुख सुयोग चव्हाण, युवा सेना शहर अध्यक्ष विनोद पिल्ले, भाजप पदाधिकारी निनाद आवटे, अमित चिपळूणकर, विनायक वरवडेकर, कुणाल आंबेकर आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news