

सावर्डे : पुढारी वृत्तसेवा
कोकण कृषी विद्यापीठ दापोली संलग्न गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय मांडकी पालवण अंतर्गत ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांमध्ये कृषी संजीवनी संघातर्फे वहाळ येथे शेतकर्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
मृदा आरोग्य कसे जपावे, फळझाडांना खते कधी टाकावीत, कोणती टाकावीत व कशी टाकावीत यासाठी मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. शेतकर्यांना मार्गदर्शन करण्यासाठी गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाचे ज्येष्ठ प्रा. महेंद्र गावणंग उपस्थित होते. यावेळी प्रा. गावणंग यांनी मृदाशास्त्र शेतकर्यांना समजावून सांगितले. मृदेचे आरोग्य कसे जपावे याच्या अनेक उपाययोजनाही सांगण्यात आल्या. तसेच याबाबतच्या शंकांचे निरसन केले. रासायनिक खतांचा होणारा बेसुमार वापर, त्यामुळे आरोग्यावर होणारे परिणाम, जमिनीची सुपीकता आदी अनेक प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.
खते घालत असताना कोणती काळजी घ्यावी, नत्र, स्फुरद, पालाश यांचे योग्य प्रमाण व ती कोणत्या पद्धतीने झाडांना टाकावीत याची माहिती दिली. शेतकरी श्रीराम वहाळकर यांच्या बागेमध्ये प्रात्यक्षिक घेण्यात आले. यावेळी कृषी कन्या खुशी गडा, साक्षी साबळे, तेजश्री पवार, स्वरूपा पाटील, साक्षी चव्हाण, प्रतीक्षा मोरे, अनुराधा पाटील, अंकिता जाधव, मधुरा रेगे, रिया कोचरेकर, स्नेहल निकम, प्रज्ञा साळवी आदींनी सहभाग घेतला.