

औरंगाबाद; रवी माताडे : पिकांसाठी आवश्यक असलेल्या १६ अन्नघटकांपैकी अनेक घटकांचे प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे जमिनीतील पिकांमध्ये पोषक अन्नघटक येत नाही. पिके, जागतिक भाजीपाला, फळांमधून हे अन्नघटक आपल्या शरीराला मिळत नसल्याने आता औषधी- गोळ्यांच्या स्वरूपात हे अन्नघटक घ्यावे लागत आहेत. रासायनिक खतांचा अतिरिक्त वापर आणि जमिनीच्या आरोग्याची काळजी न घेतल्यानेच ही वेळ आली आहे. म्हणूनच आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
जमिनीमध्ये हायड्रोजन, आक्सिजन, कार्बन, नत्र, स्फुरद, पालाश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक, लोह, तांबे, जस्त, मॉलिब्डेनम, बोरॉन, मंगल, क्लोरीन हे १६ अन्नघटक उपलब्ध असणे आवश्यक आहे. सन १९६० च्या दशकात अन्नधान्याच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी हरितक्रांती झाली. त्याबरोबर रासायनिक खतांचा वापरही वाढला. या खतांचा अतिरिक्त वापर झाल्याने जमिनीचे आरोग्य बिघडत गेले. हे प्रकार सातत्याने होत गेल्याने दर दहा वर्षांत जमिनीतील आवश्यक घटकांचे प्रमाणही घटत गेलेले आहे. आता जमिनीतील नत्र, स्फुरद, पालाश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक, लोह, जस्त, मॉलिब्डेनम, बोरॉन आदी अन्नघटकांची कमतरता असल्याचे माती परीक्षणातून समोर आले आहे. विशेष म्हणजे काही मोजक्याच जागरूक शेतकऱ्यांकडून माती परीक्षण करून घेतले जाते. सन २०२२-२३ या वर्षांत नोव्हेंबरपर्यंत औरंगाबाद जिल्ह्यातील १८१५ शेतकऱ्यांनी माती परीक्षण करून घेतले आहे. तर जमीन आरोग्यपत्रिका कार्यक्रमांतर्गत सन २०२२-२३ मध्ये कृषी विभागाने जिल्ह्यातील १६० निवडक गावांमधून १५,०९० माती नमुने गोळा केलेले असून, या माती नमुन्यांची तपासणी सध्या सुरू आहे.
उत्पादन वाढीसाठी रासायनिक खतांचा वापर वाढत चालला आहे. शेतकऱ्यांकडील पशुधनाची संख्या कमी झाल्याने शेणखताचा वापरही कमी झाला आहे. परिणामी जमिनीतील सूक्ष्म जीवाणूंची संख्या घटत चालली आहे. जमिनीचे संवर्धन व्हावे, सूक्ष्म जीवाणूंच्या संख्येत वाढ व्हावी, यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने पेरणीपूर्वी माती परीक्षण करून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात प्रयोगशाळा आहेत. तपासणीचे शुल्कही माफक आहे. या तपासणीने रासायनिक खतांचा अतिरिक्त वापर आणि त्यावरील खर्चही कमी होईल.
– दिनकर जाधव,
कृषी सहसंचालक, औरंगाबाद.