

चिपळूण : चिपळूण विकासासाठी लागेल तेवढा निधी आम्ही देऊ. तुम्ही फक्त युतीचा नगराध्यक्ष द्या. येथील निळ्या व लाल पूररेषेचा प्रश्न आपण सरकार म्हणून मार्गी लावू आणि पूररेषेचे पुनःसर्वेक्षण करू, असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चिपळूणमधील आयोजित युतीच्या प्रचारसभेत दिले. शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रासमोरील मैदानात रविवारी (दि.30) दुपारी ही प्रचारसभा झाली.
या प्रचार सभेला व्यासपीठावर उद्योगमंत्री उदय सामंत, गृह राज्यमंत्री योगेश कदम, शिवसेना उपनेते सदानंद चव्हाण, माजी आ. डॉ. विनय नातू, भाजप नेते प्रशांत यादव, शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, भाजप जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, युतीचे उमेदवार उमेश सकपाळ व पदाधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रचार सभेत विरोधकांवर फारशी टीका न करता महायुती शासनाने केलेल्या कामाचा पाढा वाचला. लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. विरोधकांनी लाडकी बहीण योजनेवर टीका केली, न्यायालयात गेले. मात्र, ही योजना कधीही बंद केली जाणार नाही अशी ग्वाही दिली.
मुख्यमंत्री असताना केलेले काम यावेळी त्यांनी अधोरेखीत केले. आपण अडलेले प्रकल्प सुरू केले, लाडकी बहीण योजना आणली, प्रवाशांना एसटीमध्ये 50 टक्के सवलत दिली. लोकाभिमुख योजना आणल्या. लाडक्या बहिणींमुळे मी महाराष्ट्राचा लाडका भाऊ झालो, असे आवर्जुन सांगितले.
चिपळूणमध्ये आलेल्या महापुराबाबत बोलताना ना. शिंदे म्हणाले, ज्यावेळी महापूर आला त्यावेळी आपण चिपळूणमध्ये दाखल झालो. येथील परिस्थिती आपण पाहिली. त्यावेळी मी नगरविकास मंत्री होतो. त्यामुळे ठाणे, पनवेल, नवी मुंबई येथील सर्व यंत्रणा चिपळुणात आणली आणि गाळाने भरलेले शहर स्वच्छ केले. लोकांना मदत करणे हेच आपले काम आहे.
यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले, चिपळुणात आपण विविध विकासकामे केली. त्यामुळे आता जनतेने आता साथ द्यावी, असे आवाहन केले. गृह राज्यमंत्री ना. योगेश कदम यांनी संपूर्ण जिल्ह्यात भगवा फडकवूया, असे आवाहन केले.