

दापोली : तालुक्यातील दाभोळ बंदरामध्ये अचानक बंदर खात्याचा सायरन वाजला आणि येथे मच्छीविक्री करणाऱ्या महिला, खरेदी करणाऱ्या नागरिकांची एकच धावपळ उडाली. सर्व ग्रामस्थांना प्रशासनामार्फत अलर्ट करण्यात आलं होतं.
युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आणि याठिकाणी शत्रूकडून कोणतीही कारवाई झाली तर नागरिकांनी व यंत्रणेने काय करायचे? याचे मॉकड्रिल दाभोळ बंदरात घेण्यात आले. यावेळी आपत्कालिन परिस्थितीची प्रात्यक्षिके घेण्यात आली.
धोक्याच्या परिस्थितीचं नाट्य रुपांतर याठिकाणी करण्यात आलं होतं. आपत्कालिन परिस्थितीत नागरिकांनी याला कशी प्रतिक्रिया देणे गरजेचे आहे? याचा सराव याठिकाणी करण्यात आला. दरम्यान, यावेळी कुठेतरी आग लागली, दहशतवादी हल्ला झाला तर येथील ग्रामस्थांना अशा परिस्थितीत सुरक्षित बाहेर काढणं आणि मदतकार्य पार पाडण्याची संपूर्ण प्रक्रिया याठिकाणी दाखवण्यात आली.
मॉकड्रिलसाठी ठरलेल्या वेळेनुसार सायरन वाजवला आणि लोकांना परिस्थिती विषयी सूचना दिल्या गेल्या. मॉकड्रिलच्या ठिकाणी असलेल्या सर्वांना सुरक्षितपणे बाहेर काढून त्यांना एका जवळपास असलेल्या इमारतीमध्ये हलवण्यात आलं. फायर ब्रिगेड, पोलीस आणि मेडिकल टीम, महसूल विभाग , होमगार्ड टीम, आशा सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी व पदाधिकारी, बंदरविभाग घटनास्थळी पोहोचले होते. या मॉकड्रिलमध्ये ग्रामस्थांनी बहुसंख्येने सहभाग घेतला होता. सद्यस्थितीत आपत्कालीन परिस्थिती उद्भवली, तर त्याचा सराव यंत्रणेला देखील असणे गरजेचे आहे त्याप्रमाणे जखमींना हलवणे, अपंग व्यक्तींना, ग्रामस्थांना सुरक्षित ठिकाणी हलवले. नौकेवर जखमी व्यक्तीला देखील स्पीड बोटीने आणण्यात आले, जखमींना अँबुलन्स मधून हलविण्यात आले.
यावेळी दापोलीचे प्रांताधिकारी विजय सूर्यवंशी यांनी अशा युध्दजन्य परिस्थितीच्या वेळी नागरिकांनी काय करायला पाहिजे ? याच्या सूचना उपस्थित नागरिकांना समजावून सांगितल्या.