

चिपळूण शहर : चिपळूण बाजारपेठेतील मुख्य व अंतर्गत रस्त्यालगत करण्यात आलेल्या अतिक्रमणांवर नगरपरिषदेच्या अतिक्रमण हटाव पथकाने जोरदार कारवाई केली. रस्त्यालगतच्या गटारांवर दुकानातील माल रचून तसेच फेरीवाल्यांनी तेथेच दुकाने थाटल्याने ही कारवाई करण्यात आली.
गेल्या काही महिन्यांपासून बाजारपेठेतील मुख्य रस्त्यालगत दुकानातील साहित्य व अन्य माल रचल्यामुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत होता. नगरपरिषद ते पानगल्ली दरम्यान अतिक्रमण मोठ्या प्रमाणात वाढले होते.
गटारांवर फळे, कांदे, बटाटे, प्लास्टिक साहित्य, चप्पल आदींची दुकाने थाटण्यात आली होती. तसेच ग्रामीण भागातील महिला रस्त्यावरच भाजी व फळ विक्री करत असल्याने वाहतुकीत अडथळे निर्माण होत होते. काही ठिकाणी तर गटाराबाहेर थेट रस्त्यावरच माल मांडण्यात येत होता. याबाबत सातत्याने तक्रारी होत असल्याने मुख्याधिकारी संजय जाधव यांनी याची गंभीर दखल घेत कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार नगरपरिषदेच्या बांधकाम विभागासह अतिक्रमण हटाव पथकाने संयुक्त मोहीम राबवली.
या कारवाईदरम्यान गटारांवर व रस्त्यालगत असलेला माल हटविण्यात आला. यापुढे गटारांवर अतिक्रमण करणाऱ्या विक्रेत्यांबर जप्तीची कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.
पहिल्या टप्प्यात नगरपरिषद ते पानगल्ली दरम्यान ही मोहीम राबविण्यात आली असून, पुढे संपूर्ण बाजारपेठेत दररोज अशी कारवाई सुरू ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. अतिक्रमण हटाव पथकाचे प्रमुख संदेश टोपरे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात येत आहे.