डिचोली : पुढारी वृत्तसेवा
सार्वजनिक बांधकाम खात्याने डिचोलीतील कातरवाडा येथे प्रस्तावित रस्त्याच्या कामाचा आदेश काढल्यानंतर संबंधित जमीनमालकांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. पूर्वजांनी जपून ठेवलेली जमीन कोणत्याही परिस्थितीत रस्त्यासाठी देणार नसल्याची ठाम भूमिका ग्रामस्थांनी घेतल्याची माहिती श्यामू गावकर इतर गावकर मंडळींनी पत्रकार परिषदेत दिली दिली.
जमीन मालकांना विश्वासात न घेता सार्वजनिक बांधकाम खात्याने कोणत्या आधारावर रस्त्यासाठी कामाचा आदेश दिला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आम्हालाही रस्ता हवा आहे; मात्र तो कायदेशीर पद्धतीने व्हायला हवा.
आमच्या जमिनीवरून जबरदस्तीने रस्ता काढण्याचा प्रयत्न आम्ही कदापिही सहन करणार नाही, असे जमीनमालकांनी स्पष्ट केले. ६३/१ ते ६३/१९ या सर्वे क्रमांकांतील भूखंडांमधून रस्त्याचे सीमांकन करण्यात आले आहे. या सर्व भूखंडांमध्ये ग्रामस्थांच्या जमिनी असून, प्रस्तावित रस्त्यामुळे प्रत्येकाच्या जमिनीचा काही भाग जाणार आहे.
रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला घरे बांधणाऱ्यांनी घर बांधतानाच रस्त्याचा विचार करायला हवा होता. आता जर रस्ता आवश्यक असेल, तर तो आमची काही जमीन व बाजूच्या भूखंडातील काही जमीन घेऊन रस्ता बांधावा, अशी मागणी शामू गावकर यांनी केली.
या भागात सुमारे २५ ते ३० घरे असून, या घरांना सुरुवातीपासूनच रस्ता नव्हता. तरीही त्या भूखंडांना बिगरशेती परवानगी कशी मिळाली, हा संशोधनाचा विषय आहे, असे ग्रामस्थांनी म्हटले आहे.
वाहनांची ये-जाही बंद करू
'ही आमची शेतीची जमीन आहे. या जागेत आम्ही पुन्हा शेती करणार आहोत. त्यामुळे यापुढे शक्य झाल्यास या जागेतून वाहनांची ये-जा देखील बंद करू, असा इशारा माधवी परब यांनी दिला.
... म्हणून जागा सार्वजनिक होत नाही
पूर्वी या ठिकाणी केवळ पायबाट होती. नंतर परिसरात घरे उभी राहिल्यानंतर या वाटेवरून रहदारी वाढली. मात्र, त्यामुळे ती जागा सार्वजनिक रस्ता होत नाही. ती आमची हक्काची जमीनच आहे, असे नीतीक्षा गावकर यांनी सांगितले.