

रत्नागिरी : सध्या जिल्ह्यासह राज्यभरात उन्हाचा पारा वाढत चालला आहे. त्यामुळे नागरिक थंडपेयाकडे वळत आहेत. लिंबांची सरबतासाठी मोठी मागणी आहे. मात्र ऐन उन्हाळ्यात बाजारात लिंबाच्या दरांनी चांगली उसळी घेतली आहे. सध्या किरकोळ बाजारात एक लिंबू १० रुपयास विकले जात आहे.
मागील महिन्यात १० ला तीन लिंबू मिळत होते. त्यामुळे लिबू सरबताचा आनंद घेणे सर्वसामान्यासाठी महाग झाले आहे. वाढत्या दरामुळे रस्त्यावर मिळणार लिंबू सरबतही २० ते २५ रुपयांपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे सध्या कोकणात लिंबू चांगला भाव खात आहे.
मागील काही दिवसांपासून उष्णता वाढत आहे, तर काहीवेळेला ढगाळ वातावरण, कधी कडक उन पडत आहे. त्यामुळे मोठ्याप्रमाणात उष्मा जाणवत आहे. घामामुळे नागरिक वैतागले आहेत. त्यामुळे शरीराला थंडावा देणाऱ्या पेयांची मागणी वाढली आहे. मात्र ऐन उन्हाळ्यात लिंबूची आवक घटल्यामुळे दर वाढले आहे.
लिंबूची मागणीही वाढलेली आहे. तरीही काहीजण लिंबू खरेदी करीत आहेत, तर लिंबू महागल्याने महिलांचा मोर्चा दह्याकडे वळाला आहे. सध्या बाजारात ६० रुपये किलो दराने दही मिळत आहे. लिंबाच्या तुलनेत ते परवडत आहे.
कोल्हापूर, सोलापूरसह इतर भागातून रत्नागिरीत लिंबाची आवक होत असली तरी ती मर्यादित आहे. मे महिन्यात लिंबाची मागणी वाढणार आहे. तसेच लिंबूच्या दरात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे.