

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील गोळवली आमकरवाडी येथील दत्त मंदिर परिसरातील ग्रामस्थांनी वृद्ध नागरिकांवरील अत्याचाराच्या गंभीर प्रकरणाबाबत संगमेश्वर पोलिसांकडे लिखित तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत उच्चशिक्षित मुलांनी आपल्या वृद्ध आईच्या देखभालीकडे दुर्लक्ष करीत तिला वाऱ्यावर सोडले असल्याचे म्हटले आहे.
ग्रामस्थांनी दिलेल्या अर्जानुसार, रुक्मिणी विठोबा आमकर (वय अंदाजे 90) या वृद्धावस्थेमुळे तसेच आजारपणामुळे पूर्णपणे अंथरुणाला खिळून आहेत. रुक्मिणी आमकर यांची देखभाल करण्याची जबाबदारी असणारा त्यांचा मुलगा महादेव विठोबा आमकर तसेच सुना त्यांना अत्यंत अमानुष वागणूक देत आहेत. वृद्ध मातेच्या जेवणापासून स्वच्छतेपर्यंत कोणतीही काळजी घेतली जात नसून, शिवीगाळ आणि मानसिक छळ केल्याचेही ग्रामस्थांनी नमूद केले आहे. ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, रुक्मिणी आमकर यांना अशा अवस्थेत एकट्याच घरात सोडून महादेव आमकर मुंबईला गेल्याने त्यांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या वृद्ध महिलांचे काही बरेवाईट झाल्यास कोण जबाबदार? असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
ग्रामस्थांनी पोलिसांना दिलेल्या अर्जात प्रौढ व ज्येष्ठ नागरिकांच्या देखभाल व कल्याण अधिनियम 2007 तसेच भा.दं.सं. कलम 151 अंतर्गत संबंधित मुलावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पंचक्रोशीतील इतर वयोवृद्ध पालकांसाठीही हे दिशादर्शक ठरावे, अशी अपेक्षा तक्रारकर्त्यांनी व्यक्त केली आहे.यात पोलिस प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून रुक्मिणी आमकर यांना संरक्षण द्यावे आणि संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी या अर्जामध्ये ग्रामस्थांनी नमूद केली आहे. संगमेश्वर पोलिसांकडून या प्रकरणाची पुढील चौकशी लवकरच सुरू केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.