

रत्नागिरी : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 नुसार अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना अंतर्गत लाभार्थ्यासाठी वितरीत करावयाचे अन्नधान्याचे मासिक नियतन प्रमाणामध्ये बदल करण्यात आला आहे. अंत्योदय शिधापत्रिकेसाठी 20 किलो तांदूळ, 15 किलो गहू मिळणार आहे.
त्यानुसार जिल्ह्यातील अंत्योदय कार्डधारकांकरिता तांदूळ प्रती शिधापत्रिका 20 किलो व गहू प्रती शिधापत्रिका 15 किलो वाटप आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थी सदस्य संख्या प्रति सदस्यांसाठी 3 किलो तांदूळ व 2 किलो गहू असा बदल करण्यात आला आहे. हा बदल माहे जानेवारी 2026 पासून वितरीत करण्यात येणाऱ्या धान्यासाठी लागू असणार आहे. माहे डिसेबर 2025 साठी पुर्वीचेच प्रमाण म्हणजेच अंत्योदय कार्डधारकांसाठी तांदूळ प्रती शिधापत्रिका 25 किलो व गहू प्रती शिधापत्रिका 10 किलो वाटप आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थी सदस्य संख्या प्रति सदस्यांसाठी 4 किलो तांदुळ व 1 किलो गहू असे आहे. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही याची सर्व रास्त धान्य दुकानदार व लाभार्थी यांनी नोंद घेण्यात यावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी राजपूत यांनी केले आहे.