

रत्नागिरी : कोकणात आता हळूहळू थंडी वाढू लागली असून पहाटे, सकाळी, सायंकाळी कडाक्याची थंडी वाढली आहे. थंडीच्या मौसमात पौष्टिक आहाराला महत्त्व दिले जाते. विशेषत: खवय्यांकडून चिकन, मटण, मासे, अंडीची सर्वाधिक मागणी असते. ऐन थंडीच्या दिवसात रत्नागिरी जिल्ह्यात अंडी, चिकन दर वाढले आहेत. एक अंडी 8 रुपयास मिळत असून 30 अंड्यांचा ट्रे 200 रुपयास मिळत आहे, तर चिकन 20 ते 30 रुपयांनी महाग झाले आहे, तरी मांसाहारप्रेमी अंडी, चिकन, माशांची मोठ्या प्रमाणात खरेदी करत असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले
पाच महिने धो-धो पाऊस पडल्यानंतर नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात कडाक्याची थंडी वाजण्यास सुरूवात झाली आहे. पहाटे रत्नागिरीसह तालुक्यातील विविध गावांवर धुक्याची चादर पसरलेली असते.अशा थंडीच्या वातावरणात अंडी, चिकन, माशांना मोठी मागणी असते. व्यायाम करणारे तसेच मांसाहारप्रेमी इतर ऋतुच्या तुलनेत थंडीच्या मौसमात मांसाहार जास्त करीत असतात. जिल्ह्यात चिकन, अंडीचे दर वाढले आहेत. एरव्ही 5 ते 6 रुपयास मिळणारी अंडी आता 8 रुपयास मिळत आहे. एक ट्रे 170 ते 180 रुपयास मिळत होता. आता 200 रुपयावर एका ट्रेची किंमत गेल्याची सांगण्यात आले, तर चिकन एका किलोस 280 रुपयास मिळत आहे.
काही तालुक्यात किमती कमी जास्त आहेत. व्यायाम करणारे तरूणाई अंडी, चिकनला मोठे प्राधान्य देते, मात्र सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसली आहे, त्यांच्या स्वयंपाकघराचे आर्थिक गणित बिघडले आहे. अंडी, चिकन दर वाढले, तर मांसाहार प्रेमींकडून मोठ्या प्रमाणात चिकन, मटण, मासे, अंड्यांची खरेदी सुरूच असल्याचे सांगण्यात आले.