

देवरुख : भाजप नेत प्रशांत यादव यांचा वाढदिवसानिमित्त ठिकठिकाणी त्यांना शुभेच्छा देणारे बॅनर लावण्यात आले. भाजपचे तालुका अध्यक्ष रुपेश कदम यांनी मार्लेश्वर फाटा येथे शुभेच्छा देणारा बॅनर लावला होता. मात्र अज्ञातांनी तो बॅनर फाडल्याने तालुकाभरातून भाजपा कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांकडून संताप व्यक्त होत आहे.
सध्या राज्यभरात निवडणुकांची रणधुमाळी सुरु असून पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांचीही तारीख कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे. नगर पंचायत निवडणुकीत भाजप ने राज्य भरात मोठे यश मिळवले आहे. राज्यातील महापालिका निवडणुकीत अनेक ठिकाणी भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. अशा स्थितीत बॅनर फाडणे ही घटना अत्यंत निंदनीय असल्याची प्रतिक्रिया रुपेश कदम यांनी दिली आहे. दरम्यान, ही घटना म्हणजे विकृत मनोवृत्तीचे दर्शन असून पराभव समोर दिसत असल्याने त्या मानसिकतेतून केलेले हे कृत्य आहे, अशा शब्दात भाजप नेते प्रमोद अधटराव यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला. घटनास्थळाला देवरुख पोलिसांनी भेट दिली असून पुढील तपास सुरु आहे.