Amba Ghat Closed | आंबा घाट बंद: ओणी–रायपाटण–अणुस्कुरा मार्ग खड्ड्यांनी पोखरला

वाढत्या वाहतुकीमुळे अपघाताचा धोका, गणेशोत्सवापूर्वी दुरुस्तीची मागणी
Oni Raypatan Anuskura Route Pothole Issues
Oni Raypatan Anuskura Route Pothole IssuesPudhari
Published on
Updated on

Oni Raypatan Anuskura Route Pothole Issues

राजापूर : कोकण आणि कोल्हापूरला जोडणाऱ्या महत्त्वाच्या आंबा घाटात दरड कोसळल्याने घाटमार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. परिणामी कोल्हापूरच्या दिशेने जाणारी वाहतूक अणुस्कुरा घाटमार्गे वळविण्यात आली असून, ओणी–रायपाटण–अणुस्कुरा मार्गावर वाहनांची मोठी गर्दी होत आहे. मात्र, आधीपासूनच खड्ड्यांनी पोखरलेल्या या मार्गावर अवजड वाहनांसह एसटी बसची वाहतूक वाढल्याने रस्त्याची अवस्था आणखी बिकट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला असून, गणेशोत्सवापूर्वी या मार्गाची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.

ओणी ते अणुस्कुरा या मार्गाची गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, वाहनचालकांना जीव मुठीत धरून त्यातून मार्ग काढावा लागत आहे. ओणी–दैतवाडी, सौंदळ घाटी, सौंदळ बाजारपेठ, कोळवणखडी, येळवण आणि रायपाटण परिसरात खड्ड्यांचे प्रमाण अधिक आहे.

Oni Raypatan Anuskura Route Pothole Issues
Amba Ghat | आंबा घाटात एस.टी.सह अवजड वाहनांसाठी वाहतूकीची बंदी! रस्त्‍याला मोठे तडे गेल्याने सुरक्षिततेसाठी निर्णय

अवजड वाहतुकीचा वाढला ताण

आंबा घाटात यापूर्वी मार्ग खचल्याने काही प्रमाणात अवजड वाहतूक अणुस्कुरा मार्गे वळविण्यात आली होती. त्यातच दोन दिवसांपूर्वी आंबा घाटात पुन्हा दरड कोसळल्याने घाटातील सर्व प्रकारची वाहतूक बंद करण्यात आली. त्यामुळे आता अवजड वाहनांसह रत्नागिरी विभागातील एसटी बसची वाहतूकही अणुस्कुरा मार्गावरून सुरू झाली आहे. परिणामी अरुंद आणि खड्डेमय रस्त्यावर वाहनांचा ताण मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

या मार्गावर लाकूड वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांची नियमित वर्दळ असते. त्याशिवाय सिलिंडर, पेट्रोल-डिझेल तसेच अन्य मालाची वाहतूक करणारी वाहनेही मोठ्या संख्येने धावतात. वाढलेल्या अवजड वाहतुकीमुळे रस्त्याचा काही भाग खचत असून, अस्तित्वातील खड्डे आणखी रुंद आणि धोकादायक होत आहेत.

Oni Raypatan Anuskura Route Pothole Issues
Amba Ghat Landslide : आंबा घाटात पुन्हा दरड कोसळली; एक मार्गिका बंद, रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील वाहतूक मंदावली

दुतर्फा झाडीमुळे रस्ता आणखी अरुंद

रस्त्याची दुरवस्था असतानाच मार्गाच्या दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणात झाडी वाढली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्याची प्रत्यक्ष रुंदी कमी झाली आहे. समोरून येणाऱ्या वाहनांना बाजू देताना चालकांना मोठी कसरत करावी लागते. त्यातच भरधाव अवजड वाहने आणि वाढलेली एसटी वाहतूक यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे.

४० लाख खर्चूनही खड्डे कायम

ओणी–अणुस्कुरा मार्ग गेल्या दोन-तीन वर्षांपासून खड्डेमय अवस्थेत आहे. मागील वर्षी उन्हाळ्यात रस्त्यावरील खड्डे तात्पुरत्या स्वरूपात बुजविण्यात आले होते. या कामासाठी सुमारे ४० लाख रुपये खर्च करण्यात आले होते. मात्र, काम झाल्यानंतर काही दिवसांतच बुजविण्यात आलेले खड्डे पुन्हा उघडले. सध्या संपूर्ण मार्गाचीच अवस्था खराब झाल्याने मागील कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

Oni Raypatan Anuskura Route Pothole Issues
Amba Ghat Accident : आंबा घाटात रिक्षाचा भीषण अपघात; चालकाचा मृत्यू

गणेशोत्सवापूर्वी दुरुस्तीची मागणी

आंबा घाट बंद असल्याने सध्या अणुस्कुरा मार्गाला पर्यायी मार्ग म्हणून मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात मोठ्या संख्येने चाकरमानी दाखल होणार आहेत. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक आणखी वाढण्याची शक्यता आहे.

त्यापूर्वी रस्त्यावरील खड्डे कायमस्वरूपी बुजवावेत, दुतर्फा वाढलेली झाडी हटवावी आणि मार्ग वाहतुकीसाठी सुरक्षित करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. आंबा घाटाला पर्यायी महत्त्वाचा मार्ग म्हणून अणुस्कुरा घाटाचा वापर वाढत असताना प्रशासनाने तातडीने दुरुस्ती न केल्यास गंभीर अपघाताला आमंत्रण मिळू शकते, अशी भीती व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news