

विशाळगड : कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ वरील आंबा घाट परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने आंबा घाटातील ओझरे खिंडीत भूस्खलनासह रस्त्याला मोठे तडे गेल्याने वाहतुकीचा धोका गंभीर बनला आहे. प्रवाशांच्या जीवितास संभाव्य धोका निर्माण झाल्याने प्रशासनाने या मार्गावरील सर्व प्रकारच्या अवजड वाहनांच्या वाहतुकीस तातडीने पूर्णबंदी घातली आहे. जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांच्या आदेशान्वये प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी याबाबत अधिकृत आदेश जारी केला आहे.
आंबा घाटातील किमी ६७.१४० ते ७४.६०० दरम्यानचा महामार्ग धोकादायक स्थितीत पोहोचला आहे. विशेषतः किमी ६९.५०० ते ६९.७०० या खोल दरीलगतच्या भागात रस्त्याची मोठ्या प्रमाणात धूप झाली असून, भूस्खलनाचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी दरड कोसळण्याची अथवा रस्ता खचण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने खबरदारीचा कठोर निर्णय घेतला आहे.
आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अंतर्गत ही वाहतूकबंदी लागू करण्यात आली आहे. घाटातील परिस्थिती पूर्णपणे पूर्ववत होऊन मार्ग सुरक्षित घोषित होईपर्यंत एस.टी. बसेससह इतर अवजड वाहनांची वाहतूक बंद राहणार आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एस.टी. वाहतुकीसाठी प्रशासनाने कोल्हापूर–गगनबावडा–तळोरे मार्गे मुंबई–गोवा महामार्ग तसेच कोल्हापूर–बाजारभोगाव–अनुस्कूरा–पाचल–रत्नागिरी हे दोन पर्यायी मार्ग निश्चित केले आहेत.
दरम्यान, प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे वायुवेग पथक आणि पोलीस प्रशासन घाट परिसरावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी प्रवाशांनी शक्यतो रात्रीचा प्रवास टाळावा, तसेच चालक-वाहकांनी प्रशासनाच्या आदेशाचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. ‘सुरक्षित प्रवास हाच सर्वोच्च प्राधान्यक्रम’ मानून प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे प्रवाशांची काही काळ गैरसोय होणार असली, तरी संभाव्य जीवितहानी टाळण्यासाठी हा निर्णय अत्यावश्यक ठरला आहे.
पर्यायी मार्ग असे :
कोल्हापूर–गगनबावडा (करूळ घाट)–तळोरे मार्गे मुंबई–गोवा महामार्ग रत्नागिरी.
कोल्हापूर–बाजारभोगाव–अनुस्कूरा घाट–पाचल–राजापूर -रत्नागिरी