khed Shiv Sena : सूर्यकांत दळवींनी महायुतीत मिठाचा खडा टाकू नये: शशिकांत चव्हाण | पुढारी

khed Shiv Sena : सूर्यकांत दळवींनी महायुतीत मिठाचा खडा टाकू नये: शशिकांत चव्हाण

खेड, पुढारी वृत्तसेवा: शिवसेनेतून भाजपमध्ये गेलेले माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी महायुतीत मिठाचा खडा टाकू नये, असा सल्ला शिवसेना जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण यांनी दिला आहे. भरणे येथील शिवसेना कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सूर्यकांत दळवी यांनी नुकतीच आ. योगेश कदम व शिवसेना नेते रामदास कदम यांच्यावर बोचरी टीका केली. त्या टीकेचा समाचार चव्हाण यांनी घेतला. khed Shiv Sena

चव्हाण म्हणाले की, आ.योगेश कदम हे दापोलीतील महायुतीचे आमदार आहेत. पाच वेळा शिवसैनिकांच्या मतावर आमदार झालेल्यांनी शिवसेना आमदाराचे पार्सल पाठवण्याचे वक्तव्य करणे हास्यास्पद आहे. वरिष्ठांनी घेतलेल्या निर्णयाबाबत स्थानिक नेत्यांनी जपून बोलण्याचे भान दळवी यांना नाही. khed Shiv Sena

केंद्रात मोदींचे हात बळकट करण्यासाठी आ.योगेश कदम व शिवसेना नेते रामदास कदम प्रयत्न करत आहेत. शिवसेनेच्या आमदारांनी केलेल्या बंडामुळे भाजपला सत्तेचे फळ चाखायला मिळत आहे, हे विसरू नये. रामदास कदम हे स्पष्ट वक्ते आहेत. पोटात एक व ओठात एक त्यांना जमत नाही. बंड करून भाजपला पाठिंबा दिलेला आहे, त्यामुळे शिवसैनिकांना न्याय मिळाला पाहिजे. त्यांचा विश्वासघात होता कामा नये.

भाजपचे गोव्याचे मुख्यमंत्री दापोलीत येऊन मतदार संघावर दावा सांगतात, माजी आमदार दळवी पार्सल परत पाठवण्याची भाषा करतात, ही कुठल्या युतीच्या धर्मात बसणारी बाब आहे, असा सवाल चव्हाण यांनी उपस्थित केला.

दापोलीतील सुज्ञ व सुसंस्कृत मतदारांनी २०१४ व २०१९ च्या निवडणुकीत दळवी यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. रामदास कदम यांच्यावर बोलले म्हणजे प्रसिद्धी मिळते, म्हणजे आपल्या मर्यादा ओलांडून काहीही बोलायचा प्रयत्न करू नका. केंद्रात आणि राज्यात महायुती भक्कम करण्यासाठी महायुतीचे सर्व कार्यकर्ते प्रयत्न करत आहेत. त्यामुळे जसे तुमचे पार्सल इकडे तिकडे फिरते आहेत तसे ते २०२४ च्या निवडणुकीवेळी कुठे असेल, याची चिंता करा.

पुढील विधानसभा निवडणुकीत आ.योगेश कदम हेच युतीचे उमेदवार असतील आणि निवडून देखील येतील. मात्र, युतीच्या या वाटचालीत मिठाचा खडा टाकायचा प्रयत्न करण्यापेक्षा आत्मपरीक्षण करा, असा सल्ला चव्हाण यांनी दळवी यांना दिला.

हेही वाचा 

Back to top button