रत्नागिरी-सिंधुदुर्गात राजकीय समीकरणे बदलणार? | पुढारी

रत्नागिरी-सिंधुदुर्गात राजकीय समीकरणे बदलणार?

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात महायुतीकडून भाजपाच्या कमळ चिन्हावर उमेदवारी दिली जाईल अशी खात्री भाजपा पदाधिकार्‍यांकडून व्यक्त केली जात असतानाच उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पुन्हा एकदा आम्ही दावा सोडलेला नसून धनुष्यबाणावरच उमेदवार असेल असे सांगितल्याने राजकीय गणिते बदलू शकतात अशी चर्चा आता पुन्हा कार्यकर्त्यांमध्ये रंगू लागली आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात माजी खा. नीलेश राणेंची एक टर्म सोडल्यास 1996पासून शिवसेनेचा खासदार या ठिकाणी विजयी होत आलेला आहे. मतदारसंघात बदल झाल्यानंतर मागील दहा वर्ष शिवसेनेचे खासदार म्हणून विनायक राऊत प्रतिनित्व करीत आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या फुटीनंतर शिवसेना शिंदेंकडून या मतदारसंघावर दावा करण्यात येत होता. उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी तिन्ही विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मोर्चेबांधणी केली आहे. त्यामुळे शिवसेनेला हा मतदारसंघ सोडण्यात यावा, अशी भूमिका मांडण्यात आली.

या मतदारसंघावर हक्क सांगण्यासाठी भाजपने आधीच फिल्डींग लावली होती. देवगडचे माजी आमदार प्रमोद जठार यांनी लोकसभा मतदारसंघात फिरुन भाजपाची मोर्चेबांधणी सुरु केली होती. त्यांना यात काही प्रमाणात यशही आले. मागील काही महिन्यांपासून भाजपाने आक्रमकपणे मतदार संघावर दावा दाखल करीत, शिवसेनेपेक्षा भाजपाची ताकद जास्त असून, शिवसेनेला विरोध असल्याचे भासवण्यास सुरुवात केली. त्यातच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे नाव पुढे आणत भाजपाने शिवसेनेची या मतदारसंघात गोची करण्याचा प्रयत्न केला. अपेक्षेप्रमाणे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे नाव पुढे आल्यानंतर मागील काही दिवसांपासून शिवसेना ‘बॅकफूट’वर गेल्याचे दिसत आहे.

शिवसेनेची ताकद असतानाही भाजपाने त्यांच्यावर कडी केल्याचे चित्र आहे. पण किरण सामंत उमेदवार असतील तरच शिवसेनेची मते शंभर टक्के महायुतीला मिळतील परंतु भाजपाचा उमेदवार असेल तर शिवसेना शिंदे गटाची मतेही दुभंगण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा पारडे शिवसेनेकडे फिरु शकते, अशी कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी गुढी पाडव्या दिवशी रत्नागिरीत येत येथील उमेदवार धनुष्यबाणावरच लढेल, असे संकेत दिल्याने, शिवसैनिक पुन्हा ‘चार्ज’ झाले असून, राजकीय गणिते बदलण्याची शक्यता आहेत. येत्या दोन-चार दिवसात हे फासे कुणाच्या पारडण्यात पडणार, हे निश्चित होणार आहे .

जर मिठात खडा पडला तर…

‘जर मिठात खडा पडला तर आमदारकीच्या वेळेला मी कुणाच्या बापालाही ऐकणार नाही…’ या अजितदादांच्या भाषणातील वाक्यांचा स्टेटस किरण उर्फ भैया सामंत यांनी ठेवल्याने तो इशारा कुणासाठी याची चर्चा रत्नागिरी-सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघात जोरदार सुरु होती.रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी शिवसेनेकडून धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवण्यास किरण उर्फ भैया सामंत हे इच्छूक होते. त्यांनी मागील सहा-सात महिन्यापासून लांजा-राजापूर व चिपळूण-संगेमश्वर मतदारसंघात मोर्चेबांधणीही सुरु केली होती.

यात अन्य पक्षातील अनेक पदाधिकार्‍यांनी किरण सामंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेत प्रवेश केला होता.महायुतीमधून शिवसेनेकडून किरण सामंत यांचे नाव चर्चेत असताना, या मतदारसंघावर भाजपाकडून दावा करण्यात आला. शिवसेनेबद्दल नाराजी असल्याचे भाजपा पदाधिकार्‍यांकडून सांगण्यात आले. त्यानंतर मागील काही दिवसात मेळाव्यावर मेळावे भाजपाकडून घेऊन चाचपणीही करण्यात आली. यात हा मतदार संघ भाजपाला जाणार की काय अशी शक्यताही निर्माण झाली आहे. परंतु अद्याप मतदारसंघात उमेदवार जाहीर झालेला नाही.

Back to top button