रत्नागिरी : मालगाडीतून धूर..., सुरक्षा तपासणी... अन् मॉक ड्रिल असल्‍याचे कोकण रेल्‍वेकडून स्‍पष्‍ट | पुढारी

रत्नागिरी : मालगाडीतून धूर..., सुरक्षा तपासणी... अन् मॉक ड्रिल असल्‍याचे कोकण रेल्‍वेकडून स्‍पष्‍ट

रत्नागिरी : पुढारी वृत्‍तसेवा रायगडमधील कोलाड येथून मडगावच्या दिशेने जाणाऱ्या मालगाडीच्या गार्डच्या डब्याजवळून अचानक धूर येऊ लागल्यामुळे ही मालगाडी काही काळासाठी सुरक्षा तपासणीसाठी थांबवण्यात आली. यामुळे कोकण रेल्वेच्या वाहतुकीत काही काळासाठी व्यत्यय निर्माण झाला. आज (बुधवार) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मात्र कोकण रेल्वेकडून सुरक्षा तपासणीचा भाग म्हणून हे एक मॉक ड्रिल असल्याचे नंतर स्पष्ट करण्यात आले.

कोलाड येथून डाऊन दिशेला येणारी मालगाडी रत्नागिरी नजीकच्या भोके स्थानकाजवळ आली असता, रेल्वे बोगद्याच्या बाहेर असताना मालगाडीच्या जनरेटर कम ब्रेक व्हॅनमधून अचानक धूर येऊ लागल्याचे निदर्शनास आले. अलीकडे रेल्वेच्या सर्वच गाड्यांमध्ये अग्निरोध यंत्रणा बसवण्यात आल्याने गाडीतून थोडा देखील धूर आला तरी ही यंत्रणा वेळीच अलर्ट करते. त्यानुसार बुधवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास भोके रेल्वे स्थानकामध्ये मालगाडीच्या ट्रेन मॅनेजरच्या डब्याजवळून अचानक धूर येत असल्याचे लक्षात आले. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मालगाडी तातडीने थांबवण्यात आली.

कोकण रेल्वेकडून सुरक्षा उपायांची तपासणी केल्यानंतर सर्व काही ठीकठाक असल्याची खात्री करून जवळपास अर्ध्या तासानंतर घटनास्थळी थांबवलेली मालगाडी गोव्याच्या दिशेने रवाना करण्यात आली. रेल्वे गाडीला आग लागल्यानंतर यंत्रणा अलर्ट आहे की नाही हे तपासण्यासाठी प्रत्यक्षात हे मॉडेल असल्याचे रेल्वे कडून स्पष्ट करण्यात आले.

हेही वाचा : 

Back to top button