रत्नागिरी, पुढारी वृत्तसेवा : डिंगणी-करजुवे दरम्यान मासे विक्री करणाऱ्या महिलेचा मृतदेह सापडला होता. सईदा रिजवान सय्यद (वय ५०) असे या मृत महिलेचे नाव होते. दरम्यान या महिलेचा खून करण्यात आला असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असून या प्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सईदा सय्यद ही महिला बुधवारी (दि.१५) घरातून मासे विक्री करण्यासाठी बाहेर पडली होती. मात्र, दुपारपर्यंत ती घरी न परतल्यामुळे कुटुंबीयांनी शोधाशोध सुरु केली. दरम्यान, शोधाशोध सुरु असतानाच डिंगणी-करजुवे रोडवर त्यांची माशांची टोपली पडलेली दिसली. तिचा आजूबाजूला शोध घेतला असता रस्त्याच्या बाहेर जंगलात तिचा मृतदेह आढळून आला.
जवळपास ३० ते ४० फुट लांब ओढत हा मृतदेह निर्जंस्थळी टाकण्यात आला होता. नातेवाईकांनी याची माहिती संगमेश्वर पोलिसांना दिली. पोलीस निरीक्षक उदय झावरे यांनी आपले सहकारी चंद्रकांत कांबळे, सचिन कमेरकर, किशोर जोयशी, अनिकेत चव्हाण यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा करून तपास सुरू केला.
खूनामागील धागेदोरे शोधण्यासाठी गुरुवार आणि शुक्रवारी पूर्ण दिवस पोलिसांनी सर्व परिसर पिंजून काढला. तसेच सईदा सय्यद हीचा पैशाचा बटवा, अंगावरील दागिने आणि मोबाईल सापडून आलेला नाही. तसेच तिचा मृतदेह लपवून आणि चेहरा विद्रूप करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न यावरून हा अपघात नसून सईदा सय्यद हीचा खूनच करण्यात आला या निष्कर्षापर्यंत पोलीस पोहचले असून संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.