पुढारी डिजीटल : पंतप्रधान मोदी यांची गणना वैश्विक नेत्यांमध्ये होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर मोदींचा उदोउदो होत असताना एका उद्योगपतीने मात्र मोदींच्या कार्यकाळाबाबत प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. हंगेरी- अमेरिकन नागरिक असलेल्या जॉर्ज सोरोस यांनी मोदींच्या कार्यकाळातील अनेक निर्णयांवर जाहीर प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. अर्थात सोरोस टीका करत असलेल्या राजकारण्यांच्या यादीत मोदी एकटेच नाहीत. शी जिनपिंग आणि पुतीन यांच्यावरही सोरोस यांनी टीका केली आहे.
काश्मीरमधील कलम ३७० हटविल्यानंतर सोरोस यांनी कडक शब्दांत मोदींवर टीका केली होती. यावेळीही त्यांनी असंच काहीस विधान केलं आहे. जगातल्या लोकशाही देशाचे नेते असूनही मोदींनी देशाला हिंदूराष्ट्र बनवण्याचे प्रयत्न सुरू ठेवले आहेत.' त्यांच्या या विधानावर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. अर्थात सोरोस यांच्या विधानावर स्मृती इराणी चांगल्याच भडकल्या आहेत. एका व्हीडियोमध्ये त्यांनी या मुद्द्यांना खोडून काढत आगपाखड केली आहे.
त्या म्हणतात, ' भारताने वर्षानुवर्षं लोकशाही मार्गाचा स्वीकार केला आहे. भारतात जॉर्ज सोरोस लोकशाहीला पर्यायाने पंतप्रधानांना झुकवण्याची भाषा करत आहेत. याचा पहिलं वार ते पंतप्रधान मोदी यांच्या कार्यव्यवस्थेवर करतील असंही त्यांनी नमूद केलं आहे. पण त्यांना मी सांगू इच्छिते. त्यांच्या या विधानाला प्रत्येक भारतीय पुरेपूर कडक शब्दात उत्तर देईल. कोविड काळातही एकही भारतीय उपाशी राहू नये यासाठी विविध योजनाही लागू केल्या गेल्या होत्या. या सगळ्या संकटातही भारतीय कायमच एकजूट राहिले आहेत. मी जॉर्ज सोरोस यांना सांगू इच्छिते की अशा शक्तिपुढे भारताने आजवर कधीच गुडघे टेकले नाहीत किंवा टेकणारही नाही.'
८.५ अब्ज डॉलर इतकी संपत्ती असलेले सोरोस अमेरिकन उद्योगपती आहेत. ओपन सोसायटी फाऊंडेशन चे ते अध्यक्ष आहेत. शेयर बाजार आणि त्याशी संबंधित उद्योगांमध्ये मोठी गुंतवणूक असलेले सोरोस बँक ऑफ इंग्लंडच्या पतनामागे असल्याचं बोललं जातं. याशिवाय हंगेरीला भांडवलशाही सत्तेच्या हातात जाऊ देण्यातही सोरोस यांची मोठ्याप्रमाणावर भूमिका होती. आशियातील राजकारणात सोरोस यांना कायमच रस राहिला आहे. शी जिनपिंग आणि मोदी हे हुकुमशाही व्यवस्थेचे मनसुबे राखून असल्याचंही त्यांनी अनेकदा स्पष्ट केलं आहे. त्यांच्या अनेक देशातील राजकारणामध्ये दखल देण्याच्या सवयीमुळेच अनेक देशांनी त्यांच्या संस्थेवर बंदी घातली आहे.
सोसरोस यांनी यापूर्वी एक खळबळजनक खुलासाही केला होता. आपल्या आईला आत्मघातासाठी मदत करण्याची तयारीही दर्शवल्याच त्यांनी एकदा कबूल केलं होतं. ते स्वत:ला नास्तिक समजतात. फ्रान्सच्या सुप्रीम कोर्टाने त्यांच्यावर अनधिकृत व्यापाराच्या गुन्ह्याखाली खटला दाखल करून शिक्षा सुनावली होती. इतकं असूनही १२ हून अधिक पुस्तकं लिहिणारा हा उद्योजक स्वत: ला तत्वज्ञ म्हणून ओळखलं जाणं पसंत करतो.