

Maharashtra weather update latest News
मुंबई: राज्यात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होणार असून, भारतीय हवामान विभागाने (IMD) १५ ते २० ऑगस्ट २०२५ या कालावधीत कोकण आणि मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या काळात कोकण आणि लगतच्या घाटमाथ्यावर काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यताही वर्तवण्यात आली आहे, त्यामुळे नागरिकांना आणि प्रशासनाला सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मान्सूनचा पुन्हा एकदा सक्रीय झाला असून, तो राज्याच्या दिशेने सरकल्याने पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. या बदलामुळे पुढील पाच ते सहा दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, सर्वाधिक पावसाचा जोर कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर दिसून येईल. या भागासाठी १५ ते २० ऑगस्ट २०२५ दरम्यान सर्वदूर पावसाची शक्यता असून, बहुतांश ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल. कोकण आणि लगतच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा (Extremely Heavy Rainfall) धोका वर्तवण्यात आला आहे. यामुळे दरडी कोसळण्याची आणि नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या मराठवाड्यालाही या काळात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये विखुरलेल्या स्वरूपात पावसाची हजेरी लागेल. बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम, तर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
येणारे पाच ते सहा दिवस राज्यासाठी, विशेषतः कोकण, मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा आणि मराठवाड्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. पावसासोबतच राज्यात काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेची शक्यता आहे. या काळात ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने सोसाट्याचे वारे वाहू शकतात. मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे संभाव्य आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करून योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.