

Dharashiv Rain News
रत्नापूर : रात्रीपासून येरमाळा आणि आजूबाजूच्या परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे धाराशिव जिल्ह्यातील तेरणा नदी दुथडी भरून वाहत आहे. नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. परिणामी परिसरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे.
रत्नापूर येथील तेरणा नदीवरील पूल पूर्णतः वाहून गेला आहे. तसेच दहिफळ, संजीतपुर, सातेफळ येथील पुलांवरून पाणी वाहू लागल्याने प्रशासनाने वाहतूक पूर्णपणे बंद केली आहे. यामुळे परिसरातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
तेरणा नदीचे पाणी शेतांमध्ये शिरले आहे. यामुळे उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः सोयाबीन, उडीद, मूग यांसारख्या खरीप पिकांना फटका बसला आहे. शेतजमिनीतील मातीही वाहून गेल्याने शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत आहे.
तहसील प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. आपत्कालीन परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी बचाव पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत. नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना शासनाकडून योग्य ती मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. प्रशासनाने या मागणीची गंभीर दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.