रायगड किल्ला : रायगडावरील विद्युतीकरणाच्या कामाचा मार्ग मोकळा! | पुढारी

रायगड किल्ला : रायगडावरील विद्युतीकरणाच्या कामाचा मार्ग मोकळा!

महाड; पुढारी वृत्तसेवा : हिंदवी स्वराज्याची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावरील विद्युतीकरणाचे काम केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या असहकार्यामुळे रखडल्याचे वृत्त दैनिक ‘पुढारी’ ने गुरूवारी प्रकाशित होताच संसदेचे अधिवेशन नाकारले. याच दरम्यान खासदार संभाजीराजे यांनी याची त्वरित दखल घेऊन केंद्रीय पुरातत्त्व खात्याला यासंदर्भात केलेल्या विचाराअंती केवळ चोवीस तासांत संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मुंबई व रायगड किल्ला येथील अधिकाऱ्यांना तातडीने या किल्ल्यावरील कामांची परवानगी देण्याचे आदेश दिल्याची माहिती समोर आली.

दरम्यान यासंदर्भात दिल्लीहून आलेल्या या संदर्भातील कार्यवाहीला महावितरणचे महाड उपकार्यकारी अभियंता यांनी दुजोरा दिला आहे. दैनिक ‘पुढारी’ गुरूवारी अंकामध्ये राजधानी किल्ले रायगडावर विद्युतीकरणाचे काम केंद्रीय पुरातत्त्व विभागाकडे मागील वर्षभरात तीन वेळा पत्रव्यवहार करूनदेखील परवानगी न मिळाल्याने रखडण्याची भीती व्यक्त करण्यात आली होती.

विद्युत वितरण कंपनीच्या महाड उपकार्यकारी अभियंता श्री. केंद्रे यांच्याकडूनच प्राप्त झालेल्या या माहितीचे वृत्त प्रकाशित झाल्याचे समजताच खासदार संभाजीराजे यांनी दिल्लीतून यासंदर्भात तातडीने हालचाली केल्या. पुरातत्त्व खात्याच्या दिल्ली येथील कार्यालयात केलेल्या विचारसरणीशी तातडीने दखल घेऊन केंद्रीय पुरातत्त्व खात्याने मुंबई व रायगड किल्ला येथील अधिकाऱ्यांना याबाबत तातडीने परवानगी देण्याचे आदेश दिल्याची माहिती खासदार संभाजीराजे यांच्या निकटवर्तीयांकडून वस्तुत प्रतिनिधीना देण्यात आली.

एक वर्षापूर्वी कोरोना महामारीचा काळ सुरू असताना अत्यावश्यक असणाऱ्या गरजा म्हणून प्राप्त झालेल्या वेळेमध्ये महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी किल्ले रायगडावर सुमारे तीन साडेतीन किलोमीटर लांबीची भूमिगत केबल टाकण्याचे काम पूर्ण केले होते.
मात्र, यानंतर किल्ले रायगडावर उभारावयाच्या असलेल्या ट्रान्सफॉर्मरसाठी जागा व बांधकामाची परवानगी तसेच मुख्य पायरी मार्गावरील पायथ्यालगत केबल टाकण्याची परवानगी तीन वेळा पत्रव्यवहार करूनदेखील पुरातत्त्व विभागाकडून देण्यात आली नव्हती.

नुकत्याच झालेल्या रायगडावरील राष्ट्रपतींच्या भेटीदरम्यान हा विषय चर्चिला गेल्याची माहिती प्राप्त झाली. याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता त्यांनीदेखील हा विषय परवानगी न मिळाल्याने राहिल्याचे कबुली देऊन याबाबत आपण पुरातत्त्व विभागाशी पत्रव्यवहार देखील केल्याचे स्पष्ट केले होते.

दैनिक ‘पुढारी’ ने छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ले रायगडावरील वितरण विभागाच्या या दुर्लक्षित झालेला कामासंदर्भात रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार संभाजीराजे यांनी घेतलेल्या दखलीचे महाडमधील शिवभक्तांकडून स्वागत होत आहे. तर उशिरा का होईना पुरातत्त्व खात्याला जाग आल्याच्या प्रतिक्रिया सर्वांकडून व्यक्त होत आहेत.

हेही वाचलंत का? 

Back to top button