रत्नागिरी: पुढारी वृत्तसेवा: सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांनी प्रचाराला सुरूवात केली आहे. तर दुसरीकडे अद्याप महायुतीचा उमेदवार निश्चित झालेला नाही. दरम्यान, आज (दि.१५) शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी किरण सामंत यांच्यासाठी अर्ज घेतला आहे. काही दिवसांपूर्वी भाजप नेते नारायण राणे यांनीदेखील उमेदवार अर्ज घेतला आहे. त्यामुळे महायुतीचे नेमके कोण उमेदवार असणार, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे. Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha
भाजपचे नेते नारायण राणे यांनी उमेदवारी अर्ज घेतला, यावर पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना रविवारी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी उमेदवारी अर्ज कोणीही घेऊ शकतो. त्यात विशेष काही नाही, असे स्पष्ट केले होते. आज दुपारी शिंदे गटाकडून किरण सामंत यांच्याकरिता अर्ज घेतल्याची माहिती समोर आली आहे. हा अर्ज घेण्यासाठी शिंदे गटाचे पदाधिकारी गेले होते. Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha
नागपूर-सिंधुदुर्ग-रत्नागिरी या लोकसभेच्या जागेसंदर्भात दोन दिवसात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा निर्णय घेणार आहेत. तोवर इच्छुक असलेले उद्योग मंत्री उदय सामंत यांचे ज्येष्ठ बंधू किरण सामंत यांना दोन दिवस शांत रहावे, असा सबुरीचा सल्ला दिला आहे. रविवारी रात्री किरण सामंत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपुरातील निवासस्थानी भेट घेतली होती.
या जागेवर गृहमंत्री अमित शहा दोन दिवसात अंतिम निर्णय घेणार आहेत, त्यामुळे किरण सामंत यांना पुढची दोन दिवस शांत राहून निर्णयाची वाट पाहण्याच्या सूचना फडणवीसांनी दिल्या आहेत. दरम्यान, दुसरे इच्छुक नारायण राणे यांना पण शांत राहण्याच्या तशाच सूचना देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
आपण 3 लाख मतांनी जिंकू, 5 वर्षे काम केले, देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर यावर तोडगा निघेल यावर विश्वास आहे. त्यांचा जो काही आदेश असेल तो मान्य असेल अशी कबुली किरण सामंत यांनी दिली होती. दुसरीकडे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात महायुतीत भाजप की सेना लढणार हा तिढा कायम आहे. दोन दिवसांपूर्वी फडणवीस यांना उद्योगमंत्री उदय सामंत भेटून गेले. हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्यामुळे धनुष्यबाणावरच निवडणूक लढवली गेली पाहिजे यावर त्यांनी भर दिला.
हेही वाचा