खेड : कोण मागे लागलंय कोकणातील पर्यटनाच्या? कोणाला माहितीच्या अधिकाराखाली मागवायला लावली माहिती? आपले राजकीय वलय वापरून गोळा केलेली ही यादी नंतर कोणत्या नेत्याने नतदृष्ट पुढाऱ्याला दिली? कोणाच्या ऑडिओ क्लिप जनतेने ऐकल्या? आदींचा खुलासा आगामी आठ दिवसांत स्वतः कॅमेऱ्यासमोर येऊन करणार असल्याचे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते अनिल परब यांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांनी कोकणवासीयांना उद्देशून लिहिलेल्या पत्रातून जाहीर केले आहे. याबाबत त्यांनी गुरुवारी (दि. ११) माध्यमांना हे प्रसिद्धी पत्र दिले आहे. (Ratnagiri News)
दापोली साई रिसॉर्ट प्रकरणानंतर सदानंद कदम हे नाव चर्चेत आले. अनिल परब यांनीदेखील आपल्या पत्रकार परिषदेत आपले मित्र असा ज्या सदानंद कदमांचा उल्लेख केला. त्याच सदानंद कदम यांनी कोकणवासीयांसाठी एक पत्र लिहिले आहे. कोकणचा शकुनी नेता कोण? ज्याने कोकणातले पर्यटन संपवण्याचा उचलला आहे विडा? शेकडो रिसॉर्ट आणि हजारोंच्या बेरोजगारीच्या मुळावर कोण उठलंय? असे अनेक प्रश्न मांडत लवकरच माध्यमांसमोर मी काही सांगणार असल्याचे सदानंद कदम यांनी पत्राद्वारे जाहीर केले आहे. (Ratnagiri News)
दापोली साई रिसॉर्ट प्रकरणी अडचणीत आलेले व तब्बल अकरा महिने ईडीने अटक केल्यानंतर ते ऑर्थर रोड जेलमध्ये राहून आले आहेत. सदानंद कदम यांनी थेट कोकणवासीयांना उद्देशून लिहिलेल्या पत्राने कोकणातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघण्याची शक्यता आहे. कदम नक्की कोणावर निशाणा साधणार याची उत्सुकता मात्र शिगेला पोहोचली आहे. (Ratnagiri News)
प्रिय कोकणकर …. आणि व्यावसायिक बंधुनो.
मी सदानंद गंगाराम कदम, आपल्या कोकणचा सुपुत्र आहे, रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड जामगे हे माझे गाव आहे, मुंबईमध्ये अनेक व्यवसायांच्या माध्यमातून उद्योग सुरु केले मात्र माझी नाळ कोकणाशी जोडलेली आहे .. खेडमध्ये सर्वात आधी मी आधुनिक शेतीच्या माध्यमातून कोकणात समृद्धी आणण्यासाठी प्रयत्न केले, ते आज यशस्वी झाले, हाच आदर्श कोकणातील तरुणांनी घ्यावा यासाठी माझे प्रयत्न सुरु आहेत, सोबतच साई रिसॉर्टच्या माध्यमातून कोकणातील पर्यटन वाढीसाठी आणि स्थानिकांना चांगला रोजगार मिळण्यासाठी मी काम केले, खेड पाठोपाठ मी दापोली मुरुड येथेही साई रिसॉर्ट बांधले मात्र राजकीय कलहाने ते विनाकारण वादात सापडले…
अखेर साई रिसॉर्टचा जो काही अनधिकृत भाग आहे तो आपण पडत आहोत, कष्टाच्या आणि मेहनतीने मिळवलेल्या पैशांनी बांधलेल्या या रिसॉर्टची एक एक वीट पडताना आपल्याला अत्यंत दुःख होत आहे. मात्र राजकीय कुरघोड्या करणाऱ्यांनी केवळ साई रिसोर्टलाच नाही तर दापोली तालुक्यातील आणि संपूर्ण कोकणातील हॉटेल आणि रिसॉर्ट चालवणाऱ्या व्यावसायिकांना अडचणीत आणले आहे. कोकण किनारपट्टीवरील शांत आणि निळ्याशार समुद्रकिनाऱ्यावर पर्यटन आणि पर्यटकांच्याऐवजी किर्र त्सुनामी आणून त्यात सर्वांना उद्ध्वस्त करण्याचे पाप झाले आहे. आपण न्यायालयीन लढा लढलो. ११ महिने तुरुंगात काढून अखेरीस माननीय सुप्रीम कोर्टाने आपल्याला दिलासा दिला. ही एका साई रिसॉर्टवरची कारवाई नाही तर संपूर्ण कोकण किनारपट्टीवरील अनधिकृत रिसॉर्टची माहिती न्यायालयाने मागवली आहे.
शासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार एका दापोली तालुक्यात १८३ बांधकामे सीआरझेड-३ मध्ये येत असून त्यांना परवानगी नाही तर संपूर्ण कोकणात सागरी किनारपट्टीवरील ३ हजार ७८० च्या आसपास अशाप्रकारचे सीआरझेड-३ मध्ये विनापरवाना असलेले रिसॉर्ट असल्याची माहिती मिळत आहे. सगळ्यांना नोटीस जात आहेत, लहान मोठ्या हॉटेल आणि रिसॉर्ट चालकांचा काय दोष आहे?. एका बाजूला व्यावसायिकांना कोकणातील पर्यटनाला चालना देण्यासाठी इतर राज्यात ज्याप्रमाणे जाचक अटींची शिथिलता करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे होते. तसे न करता कोकणातला नेता स्वतःला म्हणून घेणाऱ्याने नतदृष्ट्याच्या हातात अशा हॉटेल्सची यादी देऊन सर्वांना उद्ध्वस्त करण्याची सुपारी दिली. हे कोकणवासीयांचे न भरून निघणारे झालेले नुकसान आहे. माझ्या दापोली येथील साई रिसॉर्टवर कारवाई झाली, मी सहन केलं पण अजूनही हे काही नेते अनधिकृत रिसॉर्टवर कारवाईची मागणी करण्यासाठी कोकणातल्या राजकीय शकुनीने पुरवलेली माहिती आणि यादी हातात घेऊन जिल्हा प्रशासनाकडे घिरट्या घालत आहे.
ज्यांनी कोणी कोकणातील पर्यटन संपवण्याचा विडा उचलला आहे. याबाबत आपण लवकरच नावासह माध्यमांसमोर येणार आहे, आपल्या काही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कोकणचा शकुनी कोण? ज्याने कोकणातले पर्यटन संपवले हे आपण माध्यमांसमोर सविस्तर सांगणार असल्याचे सदानंद कदम यांनी पत्रात म्हटले आहे. (Ratnagiri News)
हे ही वाचा :