सिंधुदुर्ग जिल्ह्यात दहा बांगलादेशी नागरिक पोलिसांच्या ताब्यात | पुढारी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात दहा बांगलादेशी नागरिक पोलिसांच्या ताब्यात

सिंधुदुर्गनगरी; पुढारी वृत्तसेवा : सिमेवरील मुलखी अधिकाऱ्यांच्या लेखी परवानगी शिवाय घुसखोरीच्या मार्गाने भारतात प्रवेश करुन सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोन ठिकाणी वास्तव्य करुन राहणाऱ्या 10 बांगलादेशी नागरीकांना ताब्यात घेत सिंधुदुर्ग पोलीसांनी मोठी कारवाई केली आहे.

अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या परकिय तसेच बांगलादेशी नागरीकांचा शोध घेऊन त्यांच्या विरुध्द कायदेशीर कारवाई करण्याकरीता केंद्र शासन, राज्य शासन तसेच पोलीस महासंचालक कार्यालयाकडून वेळोवेळी सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्या अनुषंगाने सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी, दहशतवाद विरोधी शाखा व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांना अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या परकिय, तसेच बांगलादेशी नागरीकांबाबत गोपनियरित्या माहिती घेवून, शोध घेणेसाठी विशेष मोहिम राबवून परकीय नागरीक मिळून आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याबाबत सूचना दिलेल्या होत्या.

प्रभारी अधिकारी, दहशतवाद विरोधी शाखा / स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, तसेच सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांनी त्यांचेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच गोपनिय यंत्रणा सतर्क करुन अवैधरित्या वास्तव्यास असलेल्या परकीय, तसेच बांगलादेशी नागरीकांची माहिती घेणेची कार्यवाही सुरू केलेली होती.

यानुसार (दि.23) प्रभारी अधिकारी, बांदा व सावंतवाडी पोलीस ठाणे यांना त्यांच्या हद्दीमध्ये अवैधरित्या बांगलादेशी नागरीक वास्तव्यास असल्याबाबत माहिती मिळाली. या माहितीच्या अनुषंगाने अधिक शोध-चौकशी करता बांदा पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात बळवंतनगर, बांदा येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये बांगलादेशी नागरीक वास्तव्यास असल्याबाबत माहिती मिळाली. त्यानुसार प्रभारी अधिकारी, बांदा पोलीस ठाणे यांनी त्यांच्या स्टाफसह जावून तेथे वास्तव्यास असलेल्या 6 नागरीकांना ताब्यात घेवून त्यांची चौकशी केली असता ते सर्व नागरीक बांगलादेशी असल्याचे, तसेच त्यांनी भारतात येण्यासाठी व वास्तव्यासाठीचे पारपत्र काढलेले नसून अनधिकृतपणे भारतात प्रवेश करुन बळवंतनगर, बांदा येथे रहात असल्याचे निष्पन्न झाले. सदर 6 बांगलादेशी नागरीक अवैधरित्या भारतात वास्तव्य करीत असल्याने त्यांना ताब्यात घेवून त्यांच्या विरुध्द बांदा पोलीस ठाण्यात विदेशी व्यक्ती अधिनियम 1946 चे कलम 14 (अ), 14(ब) व 14(क), पारपत्र (भारतात प्रवेश) अधिनियम 1920 चे कलम 3(अ) प्रमाणे गुन्हा दाखल केलेला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

आरोंदा येथून ४ नागरिक ताब्यात

तसेच प्रभारी अधिकारी, सावंतवाडी पोलीस ठाणे यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात आरोंदा, देऊळवाडी येथे सातेरी भद्रकाली मंदिराच्या पाठीमागे एका पत्र्याच्या शेडमध्ये बांगलादेशी नागरीक वास्तव्यास असल्याबाबत माहिती मिळाली, त्यानुसार प्रभारी अधिकारी, सावंतवाडी पोलीस ठाणे यांनी त्यांच्यां स्टाफसह जावून तेथे वास्तव्यास असलेल्या 4 नागरीकांना ताब्यात घेवून त्यांची चौकशी केली असता ते सर्व नागरीक बांगलादेशी असल्याचे, तसेच ते भारत-बांगलादेश सिमेवरील मुलखी अधिकाऱ्यांच्या लेखी परवानगी शिवाय घुसखोरीच्या मार्गाने भारतात अवैधरित्या प्रवेश करुन आरोंदा, देऊळवाडी येथे रहात असल्याचे निष्पन्न झाले. सदर 4 बांगलादेशी नागरीक अवैधरित्या भारतात वास्तव्य करीत असल्याने त्यांना ताब्यात घेवून त्यांचेविरुध्द सावंतवाडी पोलीस ठाण्यात ही विदेशी व्यक्ती अधिनियम 1946 चे कलम 14 व पारपत्र भारतात प्रवेश नियम 1950 चा नियम 3(अ), 6 (अ), परकिय नागरीक आदेश 1948 परि. 3(1), (अ) प्रमाणे गुन्हा दाखल केलेला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

जिल्हावासियांनी सतर्कता बाळगावी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरीकांना आवाहन करण्यात येते की, आपल्या आजू-बाजूस कोणी बांगलादेशी नागरीक अवैधरित्या वास्तव्यास असलेबाबत माहिती मिळाल्यास, सदरबाबत स्थानिक पोलीस ठाणे, तसेच पोलीस नियंत्रण कक्ष, सिंधुदुर्ग यांना माहिती द्यावी असे आव्हान जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी केले आहे.

Back to top button