सिंधुदुर्ग : नांदगाव येथे महामार्गाच्या भूसंपादन मोजणीला नागरिकांचा विरोध | पुढारी

सिंधुदुर्ग : नांदगाव येथे महामार्गाच्या भूसंपादन मोजणीला नागरिकांचा विरोध

नांदगाव : पुढारी वृत्तसेवा : मुंबई- गोवा महामार्गासाठी भूसंपादनाच्या मोजणीला नांदगाव तिठ्ठा (ता. कणकवली) येथे स्थानिक नागरिकांनी विरोध केला. त्यामुळे हायवे प्राधिकरण आणि भूमी अभिलेखचे कर्मचारी मोजणी न करता माघारी परतले. सर्वांना नोटीसा का बजावली नाही. यामुळे अर्धवट मोजणी आम्हाला मान्य नाही, अशी भूमिका यावेळी नागरिकांनी घेतली.

यावेळी नांदगावचे सरपंच भाई मोरजकर, माजी जि.प. सभापती नागेश मोरये, उपसरपंच इरफान साटविलकर, चंदू खोत, हायवे प्राधिकरण उपअभियंता कुमावत व भूमी अभिलेखचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

सरपंच भाई मोरजकर म्हणाले की, नांदगाव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून भूसंपादनाच्या प्रश्नाबाबत ९ नोव्हेंबर २०२३ रोजी नांदगाव तिठ्ठा ब्रिजखाली आमरण उपोषण केले होते. नांदगाव पावाचीवाडी ते नांदगाव तिठ्ठा महामार्गाच्या दुतर्फा हद्द कायम करून मिळावी, अशी ग्रामस्थांची मागणी होती. महामार्गालगत असलेली शेतकऱ्यांची जमीन संपादनात किती गेली. व आता किती शिल्लक आहे, हे समजेल, अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती.

यावर मोजणी करून जागा ताब्यात देण्याचे आश्वासन महामार्ग प्राधिकरणाने दिले होते. त्या अनुषंगाने आज (दि. ५) आणि उद्या (दि. ६) दोन दिवस मोजणी होणार होती. परंतु त्यामध्ये अपेक्षित सर्वे नंबर, गट नंबर यांचा समावेश नव्हता. प्राधिकरणाकडून असा भोंगळ कारभार केल्याने ग्रामस्थांची तसेच ग्रामपंचायतची दिशाभूल झाली आहे.

जोपर्यंत ठोस लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत मोजणी करू देणार नाही, तसेच खारेपाटण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा सरपंच मोरजकर यांनी यावेळी दिला.

बेळणे, नांदगाव, असलदे येथील महामार्गाची हद्द कायम करण्यासाठी शेतकरी व नागरिकांना विश्वासात घेणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व शेतक-यांना नोटीस देणे बंधनकारक आहे. तरी यापुढे महामार्ग प्राधिकरण, भूमिअभिलेखने सर्व कायदेशीर नोटीस बजावून हद्द कायम करावी. यापूर्वीचे अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्या संगनमताने कामे झाली असून यात भष्टाचार झाला आहे.

– नागेश मोरये, माजी सभापती, जि.प. सिंधुदुर्ग

हेही वाचा 

Back to top button