

कुडाळ; पुढारी वृत्तसेवा : कुडाळ तालुक्यातील किनळोस या गावातील महिलेच्या घर फोडून आतील ४० हजार रुपये रोख रक्कम अज्ञात इसमाने चोरून नेल्याची घटना घडली. या महिलेने म्हैस विक्रीतून आलेली रक्कम पत्र्याच्या ट्रंकमध्ये ठेवली होती. अज्ञाताने ती ट्रंक फोडून रोख रक्कम चोरून नेली. ही घटना शुक्रवारी (दि. २) दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. याबाबत पोलीस स्थानकात उशिरापर्यंत अधिकृत नोंद नव्हती.
यातील महिला शेतकरी असून ती सकाळी गुरे चारण्यासाठी शेतीभागात गेली होती. यानंतर दुपारी १२ च्या सुमारास गुरे घेऊन घरी आली. यावेळी तिला घराचा दरवाजा संशयास्पदरित्या आढळला. त्यामुळे तिने घरात जाऊन पाहिले असता खोलीतील पत्र्याचा पेटीवजा ट्रंक उघडा दिसला. दरम्यान महिलेला ४० हजार रोख रक्कम गायब झाल्याचे लक्षात आले. अज्ञात इसमाने आतील हा ट्रंक फोडून आतील रोकड चोरून नेल्याचा संशय आला. या महिलेने गेल्या दिवसांपुर्वी आपली एक म्हैस विकून त्यातून आलेली रक्कम या ट्रंकात ठेवल्याचे सांगितले. यातील अज्ञाताने ती संधी साधून चोरून नेली. या महीलेचे घर निर्जन भागात असून घरात कोणी नसल्याचे संधी साधून या रक्कम चोरी झाली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. हा चोरटा माहीतगारच असावा असा संशय देखील पोलिसांनी व्यक्त केला आहे. याबाबत पोलीसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरा पर्यंत सुरू होती.