सिंधुदुर्ग: विविध मागण्यांसाठी अंगणवाडी मदतनिसांचा जि.प.समोर ठिय्या | पुढारी

सिंधुदुर्ग: विविध मागण्यांसाठी अंगणवाडी मदतनिसांचा जि.प.समोर ठिय्या

ओरोस: पुढारी वृत्तसेवा: नवीन नियुक्त केलेल्या अंगणवाडी मदतनीस कर्मचाऱ्यांना हजर होण्याचे पत्र जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत जिल्हा परिषदेसमोर ठिय्या आंदोलन सुरूच ठेवू, असा इशारा अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या नेत्या कमलताई परुळेकर यांनी आज (दि.१) दिला.

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर अंगणवाडी मदतनिस कर्मचारी यांनी आज ठिय्या आंदोलन केले. जिल्हा महिला बालविकास अधिकारी यांची बदली करा, नियुक्तीची पत्र देण्यात यावीत. संप काळातील संबंधित सर्व नोटीस मागे घेण्यात यावीत. २६ जानेवारीपासूनचे मानधन मिळावे, अशा विविध मागण्यांचे निवेदन यावेळी देण्यात आले.

नव्याने नेमणूक मिळालेल्या मदतनीसांना हजर करून घेऊ नका, कोणी त्यांना अंगणवाडीत बसू देऊ नका, जर बसवलेत, किंवा अंगणवाडीत घेतलेत, तर तुमच्यावर कारवाई होणार आहे. अशाप्रकारचा अपप्रचार अनेक सुपरवायझर यांनी केला आहे. त्यामुळे अंगणवाडी मदतनीसांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

अंगणवाडीत घेऊ नका, नाहीतर कारवाई होईल, ही दादागिरी का? सरकारने सरसकट कारवाई होणार नाही, असे सांगितल्यावर फक्त सिंधुदुर्गातील नवीन- जुन्या कर्मचाऱ्यांमध्ये हा भेदभाव का? प्रजासत्ताक दिनी अंगणवाडीत नवीन आणि जुने सर्वच अंगणवाडी कर्मचारी हजर झाले होते. तुमची हजेरी लावणारच नाही, पगार मिळणारच नाही. हे सुपरवायझर सांगतात, हे अयोग्य आहे, असे परुळेकर म्हणाल्या.

हेही वाचा 

Back to top button